पुणे : ‘पुरेशा देखभाल दुरुस्तीअभावी वीजयंत्रणा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे वीजबिल भरूनही ग्राहकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे,’ असा आरोप सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सोमवारी केला. ‘देखभाल-दुरुस्तीवरील खर्च संचलन व देखभाल यासाठी मान्य खर्चाच्या २० टक्क्यांपेक्षा कमी झाला, तर त्यातून वाचलेले पैसे अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. याचा मूळ उद्देश नागरिकांना विनाव्यत्य वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरणने देखभाल-दुरुस्तीवर पुरेसा खर्च करावा, असा आहे. मात्र, महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या पुढील पाच वर्षांसाठीच्या वीजदर प्रस्तावात नमूद केले आहे, की २०२२-२३ मध्ये देखभाल-दुरुस्तीसाठी २० टक्क्यांऐवजी १३.६ टक्केच आहे, तर २०२३-२४ मध्ये तो १५.५ टक्के आहे. याचा अर्थ या दोन वर्षांत महावितरणने देखभाल-दुरुस्तीवर केलेला खर्च आवश्यकतेपेक्षा जवळपास एक हजार कोटी रुपयांनी कमी आहे, ज्याचा फटका ग्राहकांना बसला आहे,’ असे वेलणकर यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘देखभाल-दुरुस्ती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बंद ठेवलेल्या वीजपुरवठ्या व्यतिरिक्तही वीज खंडित झाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महावितरणनेच याबाबतची आकडेवारी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यातील ग्राहकांना ऑगस्ट २०२४ मध्ये वीजपुरवठा खंडित होण्याच्या ७१,८८५ घटनांमुळे ४७,१३८ तास, सप्टेंबरमध्ये ९६,५२८ घटनांमुळे ५७,३९२ तास, ऑक्टोबरमध्ये १,०७,०८८ घटनांमुळे ६७,८१५ तास, तर नोव्हेंबरमध्ये १,०२,९८८ घटनांमुळे ५१,८७५ तास अंधाराचा सामना करावा लागला.’ या संदर्भात आयोगाशी चर्चा सुरू असल्याने अधिकृतपणे काही सांगता येणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले.
महावितरणने दर महिन्याला त्यांच्या संकेतस्थळावर वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. याला विश्वासार्हतेचे निर्देशांक म्हणतात. मात्र, महावितरण ही माहिती नियमितपणे देत नाही. याबाबत तक्रार केल्यावर एकदम २-३ महिन्यांची माहिती जाहीर केली जाते. महावितरणच्या संकेतस्थळावर विश्वासार्हतेच्या निर्देशांकाबाबत उपलब्ध असलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे.
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच