पुणे : महावितरणच्या पर्वती विभाग अंतर्गत वडगाव शाखा कार्यालयाचे वडगावमधील मध्यवस्तीत स्थलांतर करण्यात आले असून, कार्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मचाऱ्यांना ग्राहकसेवेसोबतच तक्रारी आणि समस्यांचे विनाविलंब निराकरण करण्याचे निर्देश पवार यांनी दिले. प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र बुंदेले, कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कलढोणे, राहुल यादव (स्थापत्य), विशाल लंके, वडगावचे शाखा अभियंता आतिश इंगळे या वेळी उपस्थित होते.

वडगाव धायरी उपविभागातील वडगाव शाखा कार्यालय पूर्वी अभिरूची मॉलसमोर भाडेतत्त्वावर होते. आता कार्यालयाचे वडगावमधील सिंहगड कॉलेज रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ महावितरणच्या मालकीच्या जागेत कृष्णकुंज सोसायटी येथे स्थलांतर करण्यात आले आहे. वडगाव परिसरातील सुमारे ३२ हजार ग्राहकांना वीज आणि विविध ग्राहकसेवा देणाऱ्या या कार्यालयासाठी नवीन वास्तू उभारण्यात आली आहे, असे महावितरणकडून कळविण्यात आले.

पिंपरीमधील महावितरणच्या दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत आणखी दोन उपकेंद्रांनी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. पिंपरी विभागातील गणेशम् स्विचिंग स्टेशन व म्हाडा उपकेंद्राने मानांकनाचे निकष पूर्ण केल्याबद्द्ल मुख्य अभियंता राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक नंदकुमार देशमुख यांच्याहस्ते या उपकेंद्रांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आतापर्यंत पुणे परिमंडलातील नऊ उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविले आहे, अशी माहिती महावितरणकडून मंगळवारी देण्यात आली.

मोरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात या दोन्ही उपकेंद्रांना ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांची उपस्थिती होती. ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंते दिवाकर देशमुख, भुजंग बाबर, विश्वास भोसले, नितीन गायकवाड, सहायक अभियंता सुजित ननावरे व अनिल हुलसूरकर, जनमित्र संतोष खताळ, मधुकर भालेराव, नितीन काळे, संतोष हेगडे, अनिल फाळके, प्रवीण माळवदे, राजेश शेळके, अभिषेक गोरे आदींनी मोलाचे योगदान दिले, असेही महावितरणतर्फे सांगण्यात आले.

सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड उपविभागातील २२/२२ गणेशम् स्विचिंग स्टेशन तसेच खराळवाडी उपविभागातील म्हाडा २२/११ केव्ही उपकेंद्रांनी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकनासाठी तयारी सुरू केली होती. त्यासाठी आवश्यक निकषांनुसार या दोन्ही उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. ‘आयएसओ’च्या पथकांनी या दोन्ही उपकेंद्रांना नुकतीच भेट दिली व तब्बल २७ अटी व शर्तींच्या मानकांप्रमाणे तपासणी केली. यात हे उपकेंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनासाठी पात्र ठरले.

Story img Loader