पुण्यातील कोथरुड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोटारीला दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाने तरुणाला बेदम मारहाण केली आहे. यानंतर आरोपीनं बंदूक रोखून तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

गजेंद्र अशोक हगवणे (रा. किरकटवाडी, सिंहगड) असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. याबाबत एका २६ वर्षीय तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरात राहायला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास तो दुचाकीवरुन पत्नीसह भुसारी कॅालनी परिसरातून जात होता. त्या वेळी समोरुन आलेल्या मोटारीला दुचाकीने धडक दिली. या कारणावरुन मोटारचालक हगवणे आणि दुचाकीस्वार तरुणात वाद झाला.

तरुणाने लगेचच घराजवळील नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्याच्या मागोमाग हगवणे मोटारीतून तेथे आला. हगवणे याने तरुणाकडील मोबाइल फेकून देत तरुणाला मारहाण केली. तरुण रस्त्यावर पडला. तेव्हा हगवणे याने स्वत: जवळील पिस्तुल तरुणाच्या छातीवर रोखले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. नागरिकांनी त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खुनाचा प्रयत्न तसेच मारहाण केल्याप्रकरणी हगवणेला अटक करण्यात आली. त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. कुलकर्णी तपास करत आहेत.