पुणे : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी तरुणाच्या पत्नीसह प्रियकराविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. सोपान धोंडीबा केंद्रे (वय ३३, रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद, नगर रस्ता, मूळ रा. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी केंद्रे यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे (रा. नांदेड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. सोपान यांच्या आईने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोपान यांनी ६ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.
सोपान चालक होते. तीन वर्षांपूर्वी ते पत्नी आणि मुलांसह लोणीकंद परिसरात वास्ताव्यास आले होते. २०१६ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी आणि आरोपी मधुकर यांचे अनैतिक संबंध होते. पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण त्यांना लागली होती. त्यांनी याबाबतची महिती आईला दिली होती.
हेही वाचा…बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
त्यानंतर सोपान यांनी पत्नीला समजावून सांगितले. मधुकर याच्याशी असलेले अनैतिक संबंध तोडण्यास सांगित ले. या कारणावरुन दोघांमध्ये वाद व्हायचे. पत्नी आणि प्रियकर मधुकर यांनी त्यांना धमकी दिली होती. मधुकरने सोपान यांना पत्नीला सोडून दे. मी सांभाळतो, अशी धमकी दिली होती. ६ एप्रिल रोजी सोपान यांच्या बहिणीने मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बहिणीने सोपानच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तिने मी गावी आले आहे, असे सांगितले. शेवटी तिने घरमालकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. . घरमालकाने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सोपान यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पत्नी आणि प्रियकराच्या त्रासामुळे मुलाने आत्महत्या केल्याचे आईने फिर्यादीत म्हटले आहे. लोणीकंद पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd