पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.तर आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करून सुरूवात झाली आहे.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.
आणखी वाचा-हिंजवडीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘डीजे’च्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यु? पोलीस म्हणतात…
या विसर्जन मिरवणुकी वेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार,पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
आज सकाळी मंडई चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती १० वाजून १५ मिनिटानी झाल्यानंतर बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मिरवणुक मार्गस्थ झाली. प्रभात बँड, कामायनी प्रशाला, रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ही ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.