Pune Marathi Vs Hindi Fighting Video : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरीही मराठी भाषिकद्वेषी अनेकजण महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यामुळे राज्यात सातत्याने भाषिक वाद होत आहेत. गिरगाव, मुंब्र्यानंतर आता चक्क पुण्यात एका अमराठी मालकाने मराठी तरुणांवर अन्याय केला आहे. नेहमीप्रमाणे या वादातही मनसेने हस्तक्षेप केल्याने तरुणांना न्याय मिळाला. यासंदर्भातील सविस्तर माहिती मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी व्हिडिओमार्फत दिली आहे.
पुण्यातील वाकडेवाडी येथे एअरटेलचं कार्यालय आहे. या कार्यालयातील टीमलीडर शाहबाज अहमदने काही मराठी मुलांवर अरेरावी केली. कार्यालयात हिंदीतच बोलण्याची सक्ती केली. तर गेल्या तीन महिन्यांचा पगारही रखडवून ठेवला होता. एवढंच नव्हे तर हिंदू सणांना सुट्टीही देणं बंद केलं होतं. यासंदर्भात पीडित तरुणांनी मनसेशी संपर्क साधला होता. त्यानुसार मनसेचे राज्यसचिव आशिष साबळे पाटील यांनी एअरटेल कार्यालयातील व्यवस्थापकांशी संवाद साधून याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. अन्यथा पुण्यातील तीन एअरटेलची कार्यालये फोडण्याचा इशारा दिला होता. परंतु, तरीही पीडित तरुणांच्या समस्या सोडवण्यास वरिष्ठ कमी पडले.
मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर मालकाची अरेरावी
अखेर वैतागलेल्या पीडित तरुणांनी पुन्हा मनसे कार्यालयात धाव घेऊन याप्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली. टीम लीडरकडून मराठी बोलण्यास नकार दिला जातोय. कार्यालयात हिंदीत बोलण्याची सक्ती केली जाते, असं तरुणांनी सांगितलं. तसंच, कोणत्याही सेनेला घेऊन या, तुमचा पगार देणार नाही, तुम्हाला कामावरून काढून टाकणार अशा धमक्या देण्यात आल्या, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यंना देण्यात आली. मराठी भाषिक तरुणांवर अशाप्रकारे अन्याय होत असल्याने आशिष साबळे पाटील यांनी तत्काळ एअरटेल कार्यालयात जाऊन संबंधित टीम लीडरशी चर्चा केली. तरीही त्याची अरेरावी चालूच होती, असा दावा करण्यात येतो.
शेवटी मनसे स्टाईलने या अमराठी टीम लीडरला दणका दिला असून सोमवारी या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात आला. अन्यथा एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी आणि खराडी येथील तीन एअरटेल कार्यालये फोडण्याचा इशारा देण्यात आला होता.