पुणे : कात्रज भागात दहशत माजविणारा गुंड तौसिफ उर्फ जमीर सय्यद उर्फ चूहा याच्यासह साथीदारांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली. आरोपींनी अमली पदार्थांची खरेदी विक्री, खूनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी असे गंभीर गुन्हे केले आहेत.
हेही वाचा – पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
हेही वाचा – रेल्वे प्रवासी सावधान! या ठिकाणांवरूनच आसन आरक्षित करा
टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद उर्फ चूहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज), सूरज राजेंद्र जाधव (वय ३५), मार्कस डेव्हीड इसार (वय २९), कुणाल कमलेश जाधव (वय २५) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख तौसीफ उर्फ चूहा याने टोळी तयार केली. संघटितरित्या त्याने गंभीर गुन्हे केले. तौसिफ कात्रज भागातील तरुण मुलांना हेरुन त्यांना अमली पदार्थ सेवन करण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्यांना गुन्हेगारी टोळीत सामील करून दहशत माजविण्याचे गुन्हे त्याने केले होते. तौसिफ आणि साथीदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने यांनी तयार केला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे तपास करत आहेत.