शिवाजीनगर धान्य गोदामांसाठी फुरसुंगीतील जागेचा नवा पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजीनगर येथील धान्य गोदामांच्या जागेत महामेट्रोचे मुख्य स्थानक प्रस्तावित आहे. त्यासाठी संबंधित जागेतील धान्य गोदाम, सेतू सेवा केंद्र, निवडणूक आणि पुरवठा विभागाची गोदामे अन्यत्र हलविण्यात येणार आहेत. मात्र, कोरेगाव पार्क येथील फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) आणि मरिआई गेटजवळील शासकीय दूध योजना या दोन जागांचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर शहर अन्नधान्य विभागाने फुरसुंगीमधील जागेचा प्रस्ताव महामेट्रोकडे (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन) पाठवला आहे.

मेट्रोच्या तिन्ही मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. त्याकरिता धान्य गोदामांच्या जागेत स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. धान्य गोदामासाठी पर्यायी जागा शोधण्याचे प्रयत्न गेल्या वर्षीपासून सुरू आहेत. या पर्यायी जागेचा वापर साखर, तूरडाळ आणि कारवाईत जप्त केलेले सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे. मात्र, विविध कारणांमुळे अद्यापही धान्य गोदामासाठी शहरात पर्यायी जागा मिळालेली नाही. पुरवठा विभागाची गोदामे आणि कार्यालयांचे करार महामेट्रोकडूनच करण्यात येणार असून, भाडेही महामेट्रोच भरणार आहे. जोपर्यंत राज्य शासनाकडून गोदामे आणि कार्यालयांसाठी कायमस्वरूपाची जागा मिळत नाही, तोपर्यंत स्थलांतरित करण्यात आलेल्या जागांचे भाडे महामेट्रोच भरणार आहे. या बाबतची हमी महामेट्रोकडून पुरवठा विभागाला देण्यात आली आहे.

दरम्यान, मरिआई गेटजवळील शासकीय दूध योजनेचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर शहर अन्नधान्य विभागाने नव्याने पर्यायी जागेचा शोध सुरू केला होता. चार महिने शोध घेतल्यानंतर अखेर फुरसुंगीमधील नऊ हजार चौ. फुटांची खासगी जागा पुरवठा विभागाने निश्चित केली आहे. याबाबतचा प्रस्ताव १९ ऑक्टोबरला महामेट्रोकडे पाठवण्यात आला आहे. त्यानुसार महामेट्रो खासगी मालकाशी बोलणी करून करार करणार आहे. बारा रुपये प्रति चौ. फुट अशा दराने सुमारे चार हजार चौ. फुट जागा घेण्याबाबत महामेट्रोने तयारी दर्शवली आहे. खासगी मालकाने होकार दिल्यानंतर तातडीने धान्य गोदाम आणि पुरवठा विभागाचे कार्यालय नव्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा विभागातील सूत्रांनी सोमवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पर्यायी जागेचा प्रश्न प्रलंबितच

शिवाजीनगर येथील कार्यालये स्थलांतरित करून जागेचा ताबा दोन महिन्यांत मेट्रोला देण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये दिले होते. त्यानंतर धान्य गोदामे कोरेगाव पार्क येथे स्थलांतरित करण्यात येणार होती. परंतु, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एफसीआय) धान्य गोदामांना जागा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पुन्हा शासकीय दूध योजनेच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र महामेट्रोने भाडे परवडत नसल्याचे सांगितल्याने धान्य गोदामाच्या पर्यायी जागेचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. धान्य गोदामासाठी पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत गोदामांच्या जागेचा ताबा सोडणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metro
Show comments