पुणे मेट्रो प्रकल्पाला लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत जाहीर केल्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुणे मेट्रोचे भूमिपूजन होणार का, याबाबत आता उत्सुकता आहे. पुणे मेट्रोला अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली नाही आणि त्यापूर्वीच्याही अनेक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे.
नागपूर मेट्रोचे भूमिपूजन जाहीर झाल्यानंतर लगेचच पुणे व नागपूर मेट्रोबाबत केंद्राने दुजाभाव केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडूनही केंद्र सरकारने पुणे मेट्रोचा प्रकल्प जाणीवपूर्वक मागे ठेवल्याचाही आरोप गेले काही दिवस केला जात होता. पुणे मेट्रोबाबत केंद्राकडून राजकारण केले जात असल्याचाही आरोप करण्यात येत होता. हा वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पुणे मेट्रोला लवकरच मंजुरी देण्यात येणार असल्याचे शुक्रवारी मुंबईत जाहीर केले.
पुणे मेट्रोच्या मंजुरीबाबत नायडू यांनी अनुकूलता दाखवली असली, तरी पुणे मेट्रोला अद्यापही केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता  मिळालेली नाही. त्या पूर्वी पुणे मेट्रोला पीआयबीकडून मंजुरी मिळावी लागेल. पीआयबी समोर पुणे मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण करण्याची तयारी महापालिकेत शुक्रवारी जोरात सुरू होती. या मान्यतेनंतर या प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मान्यता लागेल. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे जाऊ शकेल व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे काम सुरू करता येईल. मंजुरीच्या या प्रक्रिया वेळेत पार पडल्या, तर पुणे मेट्रोचे भूमिपूजन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होऊ शकते. त्याबाबत आता उत्सुकता आहे. मंजुरीच्या या प्रक्रियेबरोबरच मेट्रोसाठी आवश्यक असलेली स्वतंत्र कंपनी (विशेष हेतू कंपनी- स्पेशल पर्पज व्हेइकल) स्थापन करण्याबाबतही गतीने काम करावे लागणार आहे. राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कंपनी स्थापन केली जाणार असून कंपनी स्थापनेची प्रक्रिया तातडीने सुरू झाली तर मेट्रो प्रकल्पाला गती देता येणार आहे.
पुणे मेट्रो दृष्टिक्षेपात
– मेट्रोचे दोन मार्ग- वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते चिंचवड
– दोन्ही मार्गाची मिळून लांबी- ३१ किलोमीटर
– मेट्रोचा मूळ खर्च- ७,९८४ कोटी रुपये
– मेट्रोचा सुधारित खर्च १०,१८३ कोटी रुपये
– मेट्रोचा नव्याने सुधारित खर्च सादर १०,८६९ कोटी रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा