पुणे मेट्रोच्या साडेएकतीस किलोमीटर लांबीच्या दोन मार्गाना केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० मीटपर्यंत चार एफएसआय देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत ३१.५१ चौरस किलोमीटर क्षेत्रावर कोटय़वधी चौरसफूट बांधकामाचे मनोरे उभे राहणार असून या निर्णयामुळे अस्तित्वातील पायाभूत सुविधांवर फार मोठा ताण येणार आहे.
पुणे शहरातील वनाझ ते रामवाडी (१४.९२ किलोमीटर) आणि स्वारगेट ते निगडी (१६.५९ किलोमीटर) या दोन मार्गाना केंद्राने मंजुरी दिल्यानंतर मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्यापाठोपाठ अनेक नवे प्रश्नही निर्माण होणार आहेत. मेट्रोचा वापर नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला लोकसंख्येची घनता वाढवावी, अशी सूचना दिल्ली मेट्रो रेल्वेने पुणे मेट्रोसाठी तयार केलेल्या प्रकल्प अहवालात केली आहे. त्यानुसार मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला म्हणजे ३१.५१ किलोमीटर क्षेत्रात पाचशे मीटपर्यंत चार चटई निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) दिला जाईल.
या क्षेत्रात नवे बांधकाम करताना चार एफएसआयचा वापर करणे एवढेच बंधन मेट्रो प्रकल्पात नाही, तर हा एफएसआय पुढील पाच वर्षांत संबंधित जागामालकांना वापरावाच लागेल; तशी सक्ती केली जाणार आहे. या अतिरिक्त एफएसआयचा वापर केला नाही आणि भूखंड बांधकामाविना ठेवला, तर मालकांना त्या भागातील रेडी रेकनरनुसार पाच टक्के सेस भरावा लागणार आहे. तसेच बांधकामासाठीचा भूखंड वीस हजार चौरसफुटांचा असला पाहिजे अशीही अट असल्यामुळे नवे बांधकाम करताना मेट्रो मार्गालगतचे छोटे बंगले, घरे, दुकाने, गाळे पाडून मोठा भूखंड तयार करावा लागेल किंवा लाखो रुपयांचा सेस भरावा लागेल, हेही स्पष्ट झाले आहे. याा भागात झालेली बहुतांश बांधकामे एक एफएसआय वापरून झाली आहेत.
मेट्रो मार्गाच्या बाजूला चार एफएसआय दिला जाणार असल्यामुळे मुख्यत: पौड रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, जंगलीमहाराज रस्ता, स्टेशन भाग, बंडगार्डन रस्ता, नगर रस्ता तसेच जुना पुणे-मुंबई रस्ता (निगडी पर्यंत), शिवाजीनगरपासून स्वारगेटपर्यंतचा शिवाजी रस्ता या रस्त्यांच्या व भागांच्या बाजूला फार मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहतील.
आता काय होईल..?
– चार एफएसआय सक्तीने वापरावाच लागेल
– एफएसआय न वापरल्यास सेस भरावा लागणार
– जादा एफएसआयमुळे पायाभूत सुविधांवर मोठा ताण येणार
– गर्दीच्या भागात पार्किंगसह अनेक नवे प्रश्न
किती बांधकाम होऊ शकेल?
मेट्रो मार्गावर प्राथमिक अंदाजानुसार ३२ किलोमीटर क्षेत्रात म्हणजे ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रात चार एफएसआय लागू होईल. एक चौरस किलोमीटर म्हणजे १० लाख चौरसमीटर क्षेत्र होते. त्यानुसार ३२० लाख चौरसमीटर जागेवर चार एफएसआय मिळेल. त्यावरील बिल्टअप एरियाचा चार एफएसआयने विचार करता १२ हजार ८०० लाख चौरसफूट एवढे बांधकाम मेट्रो मार्गाच्या दोन बाजूंना उभे राहू शकेल.

Story img Loader