पुणे: मेट्रोचे विस्तारित मार्ग चालू महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आले आहे. विस्तारित मार्गांची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी झाली असून, आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर सेवा सुरू होईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> प्रवाशांसाठी खूषखबर! कागदी पिशव्यांना रेल्वेचा मोफत पर्याय; घरीही नेता येणार
सध्या मेट्रोची सेवा दोन मार्गांवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या एकूण १३ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. विस्तारित मार्गांवर मेट्रोची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. या मार्गांची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.
हेही वाचा >>> पुणे: भारती विद्यापीठ भागात दहशत माजवणाऱ्या गुंड टोळीवर ‘मोक्का’ कारवाई
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तीन वेळा विस्तारित मार्गांची तपासणी केली आहे. पुढील आठवड्यात ते अंतिम पाहणी करणार आहेत. त्यानंतर आठवडाभरात अंतिम अहवाल महामेट्रोला मिळेल. आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर विस्तारित मार्गावरील सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल. विस्तारित सेवा या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.
मेट्रोचे विस्तारित मार्ग
१. गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक
अंतर – ५.१२ किलोमीटर
स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल
२. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय
अंतर – ८ किलोमीटर
स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय