पुणे : महामेट्रोकडून विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे विद्यार्थी पास’ या मेट्रो कार्डची उद्यापासून (ता.६) सुरूवात होत आहे. पहिल्या १० हजार जणांना हे कार्ड मोफत दिले जाणार असून, या कार्डधारकांना तिकिटात ३० टक्के सवलत दिली जाईल.
हेही वाचा >>> पुणे: एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. माधवन यांनी स्वीकारली
‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड घेण्यासाठी किमान १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले हे कार्ड घेऊ शकतात. हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकीटामध्ये ३० टक्के सवलत लागू असेल. या कार्डची वैधता ३ वर्षे असून, ते अहस्तांतरणीय आहे.
या कार्डची रचना ‘एक पुणे कार्ड’प्रमाणे आहे. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून ‘एक पुणे विद्यार्थी पास’ मिळवता येईल. पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्ड मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत १५० रुपये आणि वार्षिक शुल्क ७५ रुपये असेल.
हेही वाचा >>> डॉ. प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबर रोजी निर्णयाची शक्यता, सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश
पुण्याला समृद्ध शैक्षणिक वारसा लाभला आहे. हे शहर देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांना आकर्षित करते. एक पुणे विद्यार्थी पासचा उद्देश विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ किफायतशीरच नाही तर सुरक्षित, आरामदायी आणि जलद बनवणे हा आहे.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो