पुणे : महामेट्रोच्या ‘एक पुणे कार्ड’ या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण करण्यात आले आहे. पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे प्रीपेड कार्ड असून, ते बहुउद्देशीय आहे. हे कार्ड पुणे मेट्रोच्या प्रवासाबरोबरच देशात कुठेही किरकोळ ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरता येऊ शकते.
महामेट्रोने कार्डसाठी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. ते रुपे योजनेवर आधारित आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ‘एक पुणे कार्ड’ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या नियमांचे पालन करते. हे बहुउद्देशीय कार्ड असून, ते मेट्रोच्या प्रवासाबरोबरच देशात कुठेही किरकोळ ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. त्यामुळे देशातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये त्याचा वापर करता येणार आहे.
हेही वाचा >>> स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका
हे कार्ड स्पर्शविरहित असून, त्यामुळे व्यवहार जलद होतात. या कार्डद्वारे एकल व्यवहारासाठी पाच हजार रुपयांपर्यंत कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. या कार्डद्वारे कोणतेही लहान-मोठे व्यवहार सहज करता येऊ शकतात. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून कार्ड मिळवू शकतात.
हेही वाचा >>> पुणे : कुलकर्णी-पाटील वादात आता जोशींची उडी
कार्डद्वारे असा होईल मेट्रो प्रवास…
– प्रवास सुरू करताना मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कार्ड टॅप करावे लागणार
– प्रवास संपवून बाहेर पडताना कार्ड टॅप केल्यानंतर तिकिटाची रक्कम कापणार
– तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही
– कार्डधारकांना मेट्रो तिकिटात दहा टक्क्यांची सवलत
– पहिल्या पाच हजार प्रवाशांना कार्ड मोफत – कार्डची किंमत १५० रुपये अधिक १८ टक्के कर