Pune Metro : पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. या मेट्रोचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलले गेले आहे. मात्र, यानंतर आता पुण्यात राजकारण तापलं आहे.
पुणे शहरातील नागरिकांना शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोसाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? असा सवाल करत महाविकास आघाडीच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. याबात महाविकास आघाडीचे पुण्यातील स्थानिक नेते एकत्र येऊन या मेट्रोमार्गाचे उद्घाटन करणार असल्याचं नेत्यांनी म्हटलं आहे. येत्या २४ तासांत हा मेट्रोमार्ग सुरु करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. मात्र, २४ तासांत हा मेट्रोमार्ग सुरू न केल्यास महाविकास आघाडी आंदोलनाच्या तयारीत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा : पिंपरी : शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी विरोध करताच प्रशासनाचे एक पाऊल मागे; पूररेषेतील बांधकामांना अभय
मेट्रोमार्गाचे उद्घाटन कधी होणार?
पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. यानंतर आता २९ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असे जवळपास ३.६२ किमी अंतराचा हा मार्ग पुणेकरांसाठी लवकरच खुला केला जाणार आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
पुणे शहरातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मेट्रोचे उद्घाटन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यात राजकारण तापलं आहे.