राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद अपेक्षित असताना केंद्राने मंजुरी दिल्यानंतर मेट्रोसाठी अर्थसाहाय्य केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे राज्याने पुणे मेट्रोसाठी विशेष काही तरतूद केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे मेट्रोसाठी यावेळी केंद्र आणि राज्याच्या अंदाजपत्रकात भरीव तरतुदी होतील अशा घोषणा गेले तीन महिने सातत्याने केल्या जात होत्या. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी फक्त नऊ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातही महाराष्ट्रातील मेट्रोसाठी एक हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले असले, तरी फक्त पुणे मेट्रोसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच निगडी ते स्वारगेट हा मार्ग शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १० हजार १८३ कोटी रुपये आहे. हे दोन्ही प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येत आहेत. केंद्राच्या मान्यतेनंतर आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाने भरीव तरतूद करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तरतूदच करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.