नागपूर मेट्रोच्या आधी पुणे मेट्रोचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवला होता. मात्र केंद्राने आकसाने पुणे मेट्रोचा प्रस्ताव मागे ठेवला, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे चव्हाण यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. पुणे मेट्रोच्या प्रकल्पाला अद्यापही अंतिम मंजुरी मिळाली नसल्याच्या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, की वास्तविक मुंबई, पुणे आणि नंतर नागपूर अशा तीन टप्प्यात मेट्रोचा प्रकल्प राबवला जाणार होता. मुंबई नंतर पुणे मेट्रोला शासनाने मंजुरी दिली होती आणि प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला होता. तसेच पुणे व नागपूर यांच्यात दुजाभाव नको म्हणून नागपूरचाही प्रस्ताव प्राधान्याने पाठवण्यात आला होता. मात्र केंद्राने फक्त नागपूर मेट्रो प्रकल्पालाच मंजुरी दिली. काही लोकांना आम्ही विदर्भासाठी काही तरी करत आहोत, हे दाखवायचे आहे. म्हणून अशा प्रकारे तेथील मेट्रो मंजूर करण्यात आली. पुण्याबद्दल मात्र आकस दाखवण्यात आला.
लोकसभा निवडणुकांमधील पराभवाबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, की केंद्र सरकारमधील घोटाळे, जनतेसमोर आलेले काँग्रेसचे तेच तेच चेहरे, महागाई, भ्रष्टाचार आणि निवडणुकीचे बदलते तंत्र यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीची जी पारंपरिक पद्धती होती, ती भाजपने बदलून टाकली आणि अमेरिकेतील निवडणुकीप्रमाणे तेथील पद्धती मोदी यांनी राबवली. तिकडचेच सर्व तंत्रज्ञान येथे वापरण्यात आले. तसेच उद्योगपतींनी भाजपला अर्थसाहाय्यही केले. त्याचाही शोध घेण्याची गरज आहे.
राजकारणात मूलभूत बदल होत असून पारपंरिक प्रचाराची पद्धत जुनी झाली आहे आणि ती अपुरी ठरत आहे. आमच्या सरकारने चांगली कामे केली. पण तरुणवर्गही काँग्रेसवर नाराज होता. त्यामुळे काँग्रेस विरोधात मतदान झाले, असेही चव्हाण यांनी सांगितले.
धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसची विचारधारा असून ती बदलण्याची गरज आम्हाला बिलकूल वाटत नाही. धर्मनिरपेक्षतेचा आमचा कार्यक्रम पुढेही सुरू राहील. या तत्त्वाच्या विरोधात भाजप काम करत असून त्यांचा कार्यक्रम हळूहळू लोकांसमोर येत आहे, असेही ते म्हणाले. राज्यात सिंचनात घोटाळा वा भ्रष्टाचार झाला असे मी कधीच म्हटले नव्हतो. मात्र त्यात चुका झाल्या आहेत असे मी म्हटले होते, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसवर जी टीका केली त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लोकसभेच्या वेळीच बैठका झाल्या होत्या. भाजपला साथ देण्याचेच त्यांचे सर्व प्रयत्न होते. त्यामुळेच भाजप-शिवसेना युती तुटताच त्यांनी आघाडी तोडली आणि सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

Story img Loader