गेली आठ वर्षे चर्चेत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकल्पाला दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रोसंबंधी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समितीने सादर केलेला अहवाल केंद्राने स्वीकारला असून या अहवालानुसार पुण्यातील मेट्रोचा मार्ग उन्नत (इलेव्हेटेड) स्वरूपाचा तर आवश्यकतेनुसार भुयारी आणि नदीकाठाने जाणारा असेल.
पुण्यातील मेट्रो इलेव्हेटेट असावी का भुयारी असावी यावरून गेले काही वर्षे वाद होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. हा अहवाल पुढे केंद्राला पाठवण्यात आला. केंद्राने बापट समितीचा अहवाल आणि मेट्रोसाठी दिल्ली मेट्रोने तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल स्वीकारला असून लवकरच पुणे मेट्रोचे काम मार्गी लागेल अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्र सदन येथे बोलावलेल्या या बैठकीत शहर व जिल्ह्य़ातील अनेक प्रलंबित विषयांबाबत निर्णय घेण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्य मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे, दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे, अजित पवार, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, विजय काळे, प्रा. मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
एकशेएक किलोमीटरचा रिंग रोड
या बैठकीतील कामकाजाची माहिती देताना बापट म्हणाले, की शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वर्तुळाकार मार्ग तयार करण्यात येणार आहे. सोमाटणे फाटय़ापासून ते चाकणमार्गे एकशे एक किलोमीटरचा हा वर्तुळाकार मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने करावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चांदणी चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग असा एकत्रित प्रस्ताव असून त्याला केंद्र सरकार मदत करणार आहे. कात्रज-देहूरोड रस्त्याचे रखडलेले काम रिलायन्स कंपनीने तातडीने पूर्ण केले नाही, तर ते रद्द करू असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.
भोसरी ते खेड सहापदरी रस्ता
पुणे ते नाशिक या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही भागात सहा पदरी रस्त्याचे नियोजन आहे. उद्योगधंद्यांमुळे वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन या टप्प्यात भोसरी ते खेड दरम्यान सहा पदरी रस्ता तयार करावा आणि त्याच्या बाजूने सेवा रस्ते करावेत असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच सहा ठिकाणी बाह्य़वळण मार्ग करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
लोहगाव विमानतळावरील ताण लक्षात घेता या विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी हवाईदलाची दहा एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय झाला आहे. तसेच एका खासगी व्यावसायिकाने विमानतळाजवळची पंचवीस एकर जागा देऊ केली आहे. त्याबाबतच्या तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जातील. दिघी बंदरापासून जळगावला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ताम्हिणी घाटातून पुणे मार्गे जाणार आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशीही माहिती बापट यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा