राज्यातील विविध शहरांतील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद आणि आरामदायी असा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात अनेक ठिकाणी मेट्रो मार्गांची उभारणीचे काम सुरु आहे. यापैकी मुंबई आणि नागपूर इथे काही ठिकाणी मेट्रो मार्ग सुरु झाले असून काही मार्गांच्या उभारणीचे युद्धपातळीवर सुरु आहे. पुण्यातही तीन मेट्रो मार्गांवर काम सुरु आहे. यापैकी महामेट्रोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पहिला मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांशी पत्रकार परिषदेच्यामाध्यमातून संवाद साधतांना महत्वपुर्ण घोषण केली आहे. पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या मेट्रो मार्गावरील पिंपरी ते फुगेवाडी हा पहिला टप्पा मेट्रो वाहतुकीकरता सज्ज असल्याचं जाहिर करण्यात आलं आहे. सुमारे सहा किलोमीटर मार्गावरील मेट्रोची सर्व कामे पुर्ण झाली असून मेट्रो स्थानकांचेही काम अंतिम टप्प्यात असल्याचं ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केलं आहे. या मार्गावर सुरक्षेसंदर्भातल्या आवश्यक पुर्तता झाल्या असल्याने १५ जानेवारीपासून या मार्गावर मेट्रो कधीही सुरु शकेल, तारीख ठरवण्याबाबत आता केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे अशी माहिती दीक्षित यांनी दिली आहे.
मेट्रो स्टेशनच्या परिसरात येणा-या नागरिकांकरता स्टेशन परिसरात लिफ्ट, सरकता जिना, स्मार्ट तिकीटसह दिव्यांग नागरिकांकरिता प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याकरता व्हिलचेअर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच महिलांकरीता वेगळी व्यवस्था मेट्रोमध्ये करण्यात आली आहे. दहा रुपयांपासुन ते पन्नास रुपयांपर्यतचा तिकीटांचा दर राहणार असुन विशेष बाब म्हणुन कोणालाही सुट दिली जाणार नाही. मेट्रोचा विस्तार वाढविण्याकरता पिंपरीसह, पुणे शहरातील सहा मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती ब्रिजेश दिक्षित यांनी दिली आहे.