पुणे : पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, जुलैअखेरीस ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे महामेट्रोने नियोजन केले आहे.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून, हा मार्ग ३.६४ किलोमीटरचा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे. या मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत

मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना तपासणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करून त्याला अंतिम मंजुरी देतील. ही मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रोकडून राज्य सरकारकडे या मार्गावर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात या मार्गावर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यास ही सेवा सुरू होणे लांबणीवर पडू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

मध्यवर्ती भागात भाविकांची सोय

शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागात मानाचे गणपती आहेत. या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे. मध्यवर्ती भागात गर्दीमुळे भाविकांना वाहनाने जाणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी भाविक मेट्रोच्या सहाय्याने जाऊ शकणार आहेत.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम जुलैच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.- अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो