मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांच्या आखणीचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रोचे प्रभाव क्षेत्र (टीओडी झोन) लवकरच निश्चित होण्याची शक्यता असून विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रुल्स) या प्रभाव क्षेत्रात अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (प्रीमियम फ्लोअर स्पेस इंडेक्स- एफएसआय) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. सध्या हे काम कर्वे रस्त्यावर सुरू असून मेट्रोसंदर्भातील नागरिकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. मेट्रोचे खांब कुठे असणार, एसएनडीटी समोरील पादचारी पूल तसाच राहणार की तो पाडला जाणार, मेट्रोचे स्टेशन नक्की कुठे असेल, असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार मेट्रो मार्गात काही बदल करण्यात आले होते. तसेच भुयारी मार्गाच्या आखणीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलांना अद्याप केंद्र शासनाची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कर्वेनगर परिसरातील नागरिकांच्या पुनर्विकासाचे प्रस्तावही प्रलंबित राहिले असून अतिरिक्त एफएसआयचा लाभ त्यांना मिळू शकलेला नाहीत.

या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘मेट्रो संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे, नगरसेवक जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्या वेळी शशिकांत लिमये यांनी मेट्रोचे प्रभाव क्षेत्र लवकरच निश्चित होईल, असे संकेत दिले. या वेळी लिमये यांनी मेट्रो प्रकल्पासंदर्भातील दृकश्राव्य सादरीकरण केले. तसेच आखणीचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध वाहनांसाठी पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू असल्याची माहिती या वेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मेट्रोचा वाघोलीपर्यंत  विस्तार करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू झाल्यानंतर मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून सुरू झाली होती. वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश मुळीक यांनी वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे वाघोलीपर्यंत विस्तारीकरण करावे, अशी मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे केली आहे. नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे त्यांनी या मागणीसंदर्भातील निवेदन दिले. मेट्रो प्रकल्पामुळे वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मुळीक यांनी व्यक्त केली. शिवाजीनगर ते रामवाडी या मार्गिकेचे काम देखील लवकर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या मार्गिकेसंबंधीची निविदा प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून मेट्रोचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दीक्षित यांनी दिले.

Story img Loader