देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेत कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले आहे. या दौऱ्यात ते पुण्यातील मेट्रो मार्गाचेही उद्घाटन करणार असल्याची शक्यता आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रोमार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. महामेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक हे दोन्ही मेट्रो मार्ग पूर्ण झाले असल्याचे सरकारला कळवण्यात आले आहेत. परंतु, याबाबत राज्य सरकारकडून आम्हाला कोणतेही उत्तर आलेले नाही.” तसंच, या मार्गांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेले हे दोन्ही मार्ग दोन महिने उशिराने पूर्ण झाले आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी शनिवारी या मार्गांची अंतिम पाहणी पूर्ण केली. दोन्ही मार्गांवर सेवा सुरू करण्यास आयुक्तांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. अधिकारी आता सुरक्षा प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर २०१८ मध्ये पुणे मेट्रोची पायाभरणी केली होती. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये त्यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. पिंपरीतील PCMC मुख्यालय ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेजपर्यंतच्या दोन मार्गांचे उद्घाटनही त्यांनी केले. फुगेवाडी-शिवाजीनगर मार्ग कार्यान्वित झाला की, पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अन्य कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासह अन्य काही कार्यक्रमही होणार आहेत. त्यात महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पूर्ण झालेल्या घरांचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी लोकार्पण होणार असून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.