पुणे : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता वेगाने सुरू आहे. हा मार्ग एकूण २८० किलोमीटरचा असून, त्यांपैकी ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी एकूण चार हजार ८८२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. पुणे-मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे १६७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यात पुणे-शिंदवणे, आंबळे- नीरा, आले-लोणंद, पळशी-जरंडेश्वर, सातारा-कोरेगाव, सांगली-शेणोली या दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे.
सध्या ८१.३४ किलोमीटरचे काम संपत आले आहे. त्यात लोणंद-नीरा, पळशी-आले, सातारा-जरंडेश्वर, शेणोली-तारगाव, सांगली-मिरज या दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे. याच वेळी ३०.५ किलोमीटरचे काम वेगाने सुरू आहे. त्यात आंबळे-शिंदवणे, तारगाव-कोरेगाव या दरम्यानच्या मार्गाचा समावेश आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार आहे. याचबरोबर एका गाडीसाठी इतर गाड्या थांबवून ठेवण्याचा प्रकारही कमी होईल. त्यामुळे पुणे ते मिरज हा रेल्वे प्रवास कमी वेळात करणे शक्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची यामुळे मोठी सोय होणार आहे.
हेही वाचा : जेजुरीतल्या कडेपठारावर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा नराधम अटेकत, पोलिसांची कारवाई
काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान
पुणे-मिरज लोहमार्ग दुहेरीकरणाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले. हे काम अद्याप पूर्ण झाले नसून, ते डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या लोहमार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी जास्त मोबदला मागितल्यामुळे भूसंपादनाचा प्रक्रिया रखडली होती. या कामाला आता वेग आला असला, तरी हे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे.