पुणे : हरवलेले मांजर शोधून देण्याचा बहाणा करून मोबाईल क्रमांक मिळविल्यानंतर महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या अविनाश नावाच्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याने महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील चित्रीकरण आणि संभाषण पाठविला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी एका ४९ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश नावाच्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठ ते रात्री अकराच्या दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने पाळलेले मांजर काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्या शोध घेत असतानाही मांजर मिळालेले नाही. दरम्यान, त्यांच्या येथे राहणाऱ्या अविनाशने हरवलेले मांजर शोधून देतो, असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. ‘मांजर शोधून दिल्याच्या बदल्यात तुम्ही माझ्यासोबत तसेच माझ्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेवा’, असे बोलून त्यांचा विनयभंग केला. त्याबरोबरच तक्रारदारांच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील चित्रीकरण आणि संभाषणही पाठविले. एवढेच नव्हे तर ‘मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, तसेच जीव घेऊ शकतो’, असे बोलून महिलेला धमकी दिली. पोलीस निरीक्षक पुरी पुढील तपास करीत आहेत.