पुणे : प्लास्टिक बाटल्या, शीतपेयांचे धातूचे कॅन्स, प्लास्टिकची वेष्टणे यांचा पुनर्वापर करण्यासाठी मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली ‘स्वच्छ एटीएम केंद्र’ कचऱ्यात गेली आहेत. शहराच्या विविध भागांत बसविण्यात आलेली स्वच्छ एटीएम बंद पडली असतानाही या स्वच्छ एटीएम केंद्रांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
शहरातील प्लास्टिकच्या वस्तूंचा वाढता वापर लक्षात घेता पुनर्वापर आणि विघटनासाठी स्वच्छ एटीएम ही संकल्पना पुढे आली. दिल्ली येथील नोएडाच्या धर्तीवर शहराच्या विविध भागांत अशी एटीएम बसविण्याचे निश्चित करण्यात आले. महापालिकेच्या स्थायी समितीनेही या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात ४० ठिकाणी स्वच्छ एटीएम बसविण्याचे नियोजित असताना प्रायोगिक तत्त्वावर केवळ नऊ ठिकाणी ती बसविण्यात आली. मात्र योजनेची प्रसिद्धी आणि प्रचार योग्य प्रकारे न झाल्याने स्वच्छ एटीएम बंद असल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. त्यात एटीएम या नावामुळे त्यातून पैसे मिळतील, या शक्यतेने एटीएमची चोरट्यांकडून फोडाफोडीही झाली होती. एटीएम वापराअभावी बंद असल्याने आणि त्यांची दुरवस्था झाल्यानंतरही ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा घाट महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घातला आहे.
संबंधित कंपनीने एटीएमसाठी सुरक्षारक्षक पुरवावेत आणि त्याची देखभाल दुरुस्ती करावी तसेच एटीएमवर जाहिरात करण्यासाठी आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घ्यावी आणि उत्पन्न मिळवावे, या केंद्रांसाठी महापालिकेकडून वीज दिली जात आहे. त्याची रक्कम कंपनीने भरावी, अशी सूचना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ठेकेदाराला करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ठेकेदाराकडून कोणत्याही ठोस उपायोयजना करण्यात आल्या नाहीत. मात्र त्यानंतरही या स्वच्छ एटीएमला महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढीचा घाट घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घालण्यात आला आहे.
संकल्पना काय?
दिल्ली येथील नोएडाच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली होती. प्लास्टिकच्या बाटल्या, वेष्टणे आणि शीतपेयांच्या धातूचे कॅन रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्यात टाकून दिल्या जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने तो टाळण्यासाठी स्वच्छ एटीएम केंद्रात प्लास्टिकच्या बाटल्या, धातूचे कॅन देणाऱ्याच्या बँक खात्यात काही रक्कम जमा होत होती. भ्रमणध्वनी दिल्यानंतर ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची सुविधा यामध्ये होती. मिळणारी रक्कम मोठी नसली तरी प्लास्टिक कचरा रोखला जाण्याच्या हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली होती.
शहरातील तीन स्वच्छ एटीएम केंद्र कार्यान्वित आहेत. दोन केंद्रांना वीज जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित केंद्रांचा आढावा घेतला जाईल. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग