पिंपरी : शहरातील नळजोडधारकांकडे १२८ कोटी ३८ लाख ७४ हजार रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी आहे. त्यामुळे करसंकलन विभागाने पाणीपट्टी वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्या अडीचशेपेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असे तीन लाख ११ हजार ३९१ अधिकृत नळजोडधारक आहेत. महापालिकेला पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. थकबाकीही वाढत होती. मालमत्ताकरातून दिवसेंदिवस उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने उत्पन्नावर परिणाम होत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी वसुली ही करआकारणी व करसंकलन विभागामार्फत करण्याचा निर्णय घेतला. मालमत्ताकर आणि पाणीपट्टी एकत्र वसूल करण्याचा निर्णय यशस्वी होताना दिसत आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच ६३ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली आहे. तसेच उर्वरित २७ दिवसांत विक्रमी पाणीपट्टी वसूल करण्याचा मानस असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकलेल्या आणि क्षमता असूनही ती न भरणाऱ्या अडीचशेपेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित केले आहेत. मीटर निरीक्षक आणि करसंकलन विभागाच्या पथकाकडून नळजोड खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. यामुळे नागरिक पाणीपट्टी भरण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.
दि. ३१ मार्चपर्यंत थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ७५ कोटींची पाणीपट्टी वसूल करण्यावर विभागाचा भर आहे. आगामी आर्थिक वर्षापासून पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने करसंकलन विभागाच्या वतीने बोगस नळजोड शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा – संजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का? चंद्रकांत पाटलांचा प्रश्न
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील म्हणाले की, मालमत्ताकर आणि पाणीपट्टी एकत्रित वसूल करण्यामुळे पाणीपट्टीवसुलीचा आलेख वाढत आहे. आगामी आर्थिक वर्षात मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची देयके एकत्रित दिली जाणार आहेत.