पुणे : शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत महापालिकेकडून कडक पावले उचलली जाणार आहेत. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी संबधित संस्थांना नोटीस बजावण्यात येणार असून, ३१ जानेवारीपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात केंद्र, राज्य सरकारच्या अनेक कार्यालयांसह रेल्वेसह पुणे आणि खडकी कटक मंडळे आहेत. त्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या सर्व विभागांकडे मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकली आहे. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे थकबाकीदार संस्थांना पुन्हा एकदा नोटीस बजावून थकबाकीची रक्कम भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली जाणार आहे. नोटीस बजावूनही थकबाकीची रक्कम न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा – नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात धुक्यासह गारठा वाढणार, कसं असेल हवामान?

महापालिकेने शासकीय संस्थांची थकबाकी वसूल करण्यासाठी गेल्यावर्षीही विशेष मोहीम राबवली होती. शासकीय संस्थांपैकी एकट्या पुणे कटक मंडळाकडे ४० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कटक मंडळाचा पाणीपुरवठा गेल्यावर्षी बंद करण्यात आल्यावर कटक मंडळाने तातडीने दोन कोटी रुपयांची रक्कम भरली. मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यात आलेली नाही. हीच परिस्थिती अन्य संस्थांबाबतही असल्याने आता अधिक कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थी संघटनांवर बंधने, कार्यक्रम, आंदोलनांसाठी कार्यपद्धती तयार… काय आहेत प्रस्तावित नियम?

फुरसुंगीचा पाणीपुरवठा ३१ जानेवारीपर्यंत सुरू

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमांतून देवाची उरूळी, फुरसुंगी आणि मंतरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना करण्यात आली आहे. त्यासाठीचा निधी महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. योजनेतील जलवाहिनी, साठवण टाकी आणि जलकेंद्राचे काम झाले असले, तरी रेल्वेमार्ग ओलांडून टाकाव्या लागणाऱ्या मुख्य वाहिनीच्या कामाला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे काम रखडले होते. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच फुरसुंगी परिसरासाठी मुठा उजवा कालव्यातून पाणी उचलण्यात येते. त्यासाठी कालव्यात पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर लष्कर जलकेंद्रातून थेट जलवाहिनी करून फुरसुंगीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्याभरात जलकेंद्रावर पंप बसवण्याचे काम पूर्ण करून देवाची उरूळी, फुरसुंगी आणि मंतरवाडीला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.