पुणे : गणेशोत्सवानंतरही मंडप, कमान न काढणाऱ्या ७० सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे, तर एकूण २३ मंडळांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी मंडळांसाठीची नियमावली महापालिकेकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार कमानीची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून १८ फुटांपेक्षा जास्त ठेवून उत्सवानंतर मंडळांनी पुढील तीन दिवसांच्या आत स्वखर्चाने मंडप, कमानी, रनिंग मंडप, रस्त्यावरील देखावे, विटांची बांधकामे हटवून रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने हटविणे बंधनकारक करण्यात आले होते. उत्सवानंतर दोन दिवसांच्या आत मंडप काढण्याचे बंधनही मंडळांवर घालण्यात आले होते. या अटींवरच महापालिकेने मंडळांना परवानगी दिली होती.
हेही वाचा – पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश
हेही वाचा – चंद्रकांतदादांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीकडे! आढावा बैठक घेत दिल्या सूचना
मात्र, विसर्जनानंतरही अनेक मंडळांकडून मिरवणुकीतील रथ, उत्सवाच्या काळातील मंडप हटविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने मंडळांनी मंडप तातडीने हटवावेत, असा आदेश अतिक्रमण विभागाने दिला होता. त्यानुसार ७० मंडळांना नोटीस बजाविण्यात आली असून, एकूण २३ मंडळांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून देण्यात आली.