पुणे : पाषाण भागातील एका मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून शाळेतील शिपायाला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून मोबाइल जप्त केला असून, मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्या शिपाईविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण भागातील एका शाळेत मंगळवारी शारिरिक शिक्षणाचा (पीटी) तास होता. मैदानावर प्रशिक्षण पार पडल्यानंतर विद्यार्थिनी शाळेतील प्रसाधनगृहात (चेजिंग रुम) गेल्या. त्यावेळी आरोपी शिपाई कपडे बदलण्याच्या खोलीजवळ थांबल्याचे विद्यार्थिनींनी पाहिले. त्यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी मोबाइल संच तेथे ठेवून तेथून तो निघून गेला.
हेही वाचा >> पुणे: शरद मोहोळ टोळीचा सदस्य विकीला पिस्तुलासह हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
प्रसाधनगृहाजवळ थांबलेल्या एका विद्यार्थिनीच्य लक्षात हा प्रकार आला. तिने मोबाइल संच पाहिला. तेव्हा मोबाइलमधील चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात आले. तिने त्वरीत या घटनेची माहिती शिक्षकांना दिली. शाळेच्या प्रशासनाने या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी शिपायाची चैाकशी करुन त्याला ताब्यात घेतले. महिनाभरापूर्वी कर्वेनगर भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्याशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नृत्य शिक्षकाला वारजे पोलिसांनी अटक केली होती.