नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र आहे. या केंद्राच्या सर्व बाजूंच्या सीमाभिंतीलगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रदर्शन केंद्राच्या पूर्व बाजूस पुणे-नाशिक महामार्ग असून, सीमाभिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा आणून टाकला जात आहे. जवळच असणाऱ्या उपबाजार समितीतून खराब झालेला भाजीपाला काही विक्रेते टेम्पोमधून येथे आणून टाकत आहेत. या परिसरात अनेक बांधकामे सुरू असून त्याचा राडारोडादेखील याच ठिकाणी आणून टाकला जात आहे. यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना शहराच्या अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. अशीच परिस्थिती उत्तर बाजूच्या सीमाभिंतीलगत आहे. या ठिकाणीदेखील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणून टाकला जात आहे. यात भर म्हणून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणारे वाहनचालकही कचरा रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे येथील नागरिक हैराण आहेत.

हेही वाचा – Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

u

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढीग

या प्रदर्शन केंद्राची सीमाभिंत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कचरा उघड्यावरच टाकला जात आहे. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी येथील नागरिक चालण्यासाठी येत असतात. मात्र, येथील पदपथावर झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक निघालेले आहेत. यामुळे नागरिकांना सेवा रस्त्यावरून चालावे लागत आहे.

परिसरात दुर्गंधी

औद्योगिक क्षेत्र जवळच असल्याने अनेक कामगार पायी ये-जा करत असतात. त्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जवळच अनेक गृहप्रकल्पही उभारले जात आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

नागरिक काय म्हणतात?

प्रदर्शन केंद्राच्या उत्तर बाजूस महापालिकेकडून अर्बन स्ट्रीट अंतर्गत कोट्यवधी रुपयांचे काम सुरू आहे. असे असताना इतर तीन बाजूंच्या स्वच्छतेबाबत आणि सोयीसुविधांबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप दत्तात्रय आल्हाट यांनी केला. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात यावी. या रस्त्यांच्या पदपथाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गणेश आल्हाट यांनी केली.

हेही वाचा – Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

प्रशासनाचे म्हणणे काय?

महापालिकेच्या वतीने दररोज येथील कचरा उचलला जातो. मोठा परिसर व मोकळी जागा असल्याने नागरिक कचरा आणून टाकतात. कचरा समस्येबाबत परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune moshi international exhibition center garbage dump pune print news ggy 03 ssb