गृहिणी असलेल्या पुण्याच्या नियोमी डे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेवर आपले नाव कोरले. कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना नियोमी डे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी नियोमी यांच्या आई मेघना खांडेकर, दिवा पेजेंटचे अंजना मास्कारेन्हास आणि कार्ल मास्कारेन्हास आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा पेजेंटतर्फे ‘मिसेस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेचे पुण्यात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. घर सांभाळतानाही आपण महिला सक्षमपणे आपल्यातील कलागुणांना वाव देऊ शकतो, हे या स्पर्धेतून सिद्ध झाले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातून ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये २० ते ३३ या वयोगटात (सिल्व्हर कॅटेगरी) २० स्पर्धक, तर ३३ च्या पुढे (गोल्ड कॅटेगरी) २० स्पर्धकांचा समावेश होता.

तत्पूर्वी, राज्यातून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर येथून निवड चाचणी घेण्यात आली होती. जवळपास ३०० महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ओळख परेड, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे आदी निकषांवर ही निवड करण्यात येते. नियोमी या ज्येष्ठ पत्रकार संपादक सुकृत खांडेकर यांच्या कन्या, तर कर्नल सौरव नारायण डे यांच्या पत्नी आहेत. कर्नल सौरव डे सध्या काश्मीर येथे ३५ आरआर (राष्ट्रीय रायफल्स) चे नेतृत्व करीत आहेत. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे.

नियोमी यांचा जन्म व शालेय शिक्षण मुंबईत, तर पदवीचे शिक्षण पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयात झाले. माध्यम क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन येथून टीव्ही आणि व्हिडीओ प्रॉडक्शनचे शिक्षण घेतले. सहायक दिग्दर्शक व सहायक निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. अंतहीन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बंगाली चित्रपटासाठी दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्याबरोबर काम केले आहे. त्या प्रमाणित रिबॉक ट्रेनर आणि झुंबा इन्स्ट्रक्टर आहेत.

या यशाबद्दल नियोमी डे म्हणाल्या, “कुटुंबाचा पाठिंबा आणि अंजना मॅडम व कार्ल सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा किताब पटकावू शकले. माझ्यातील घरात बसलेली स्त्री त्यांनी बाहेर काढली. सॉफ्ट स्किल्स ट्रेनर असल्याने स्पर्धेतील सर्व गोष्टी सहजपणे करता आल्या. या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे आता मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्ससाठी उत्सुक आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mrs maharashtra 2018 winner
Show comments