पुणे : पुणे-मुंबई अंतर पुढील वर्षी १३ किलोमीटरने कमी होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) कामाची गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर बोलताना भुसे म्हणाले, ‘द्रुतगती महामार्गावरील १३.३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मिसिंग लिंकवर १८० मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आणि सर्वात जास्त रुंदीचा बोगदा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा, खंडाळा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांची वेळ आणि इंधनात बचत होणार आहे.

हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळेंशी संबंधित ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार संतापले, म्हणाले, “तुम्ही अक्कल…”

हेही वाचा – मनमानी कारभार! पुण्यात रेल्वेचे अधिकारी वरिष्ठांना जुमानेनात

दरम्यान, पाहणी पूर्वी कुसगाव येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रकल्पाच्या कामाविषयी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये प्रकल्पाची लांबी, रुंदी, उंची, किंमत, तसेच मार्गिका, वाहनाची वेग मर्यादा, वाहतूक कोंडी, सुरक्षितता, पाण्याचा निचरा, कामाचा दर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आदीबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mumbai distance will be reduced by 13 km next year know how missing link work in progress pune print news psg 17 ssb
Show comments