Mumbai-Pune Express Way Link Road: येत्या चार महिन्यांत मुंबईसह पुणेकरांसाठीही अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. त्यातच आता पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार असल्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे पुण्यापासून नवी मुंबई विमानतळावर जाण्याचा वेळही कमी होणार आहे.
लोणावळा शहराच्या बाहेरून द्रुतगती मार्गाला समांतर जाणारा लिंक रोड लवकरच तयार होऊन प्रवाश्यांच्या वापरासाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या पुणे ते मुंबई हे अंतर साधारणपणे १६० किलोमीटर आहे. त्यावरून पुण्याहून मुंबईला पोहोचण्यासाठी अंदाजे ४ तासांचा वेळ लागतो. पण पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अंतर अवघं १२० किलोमीटर आहे. त्यातही लोणावळ्याजवळील बायपास लिंक रोडमुळे पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्याचा वेळ अवघा २ तासांपर्यंत कमी झाला आहे.
९० टक्के काम पूर्ण!
“लोणावळ्याजवळील लिंक रोडचं काम जवळपास ९० टक्के पूर्ण झालं आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्यांचा किमान अर्धा तास या लिंक रोडमुळे कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन जूनमध्ये आहे. वेगाने काम होत आहे. आम्हाला कल्पना आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे आणि लोकांना विमानतळापर्यंत कमीत कमी वेळात पोहोचायचं असेल. पण लिंक रोडमध्ये दोन बोगदे आणि दोन पुलांचा समावेश आहे. त्यामुळे घाईगडबडीत आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही”, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंते राकेश सोनावणे यांनी दिली.
विश्लेषण : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आठ पदरीकरण कधी? फायदा काय? विलंब का?
२ पूल आणि १.७ किलोमीटरचे बोगदे
या लिंकरोडमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचं अंतर ६.५ किलोमीटरनं कमी होईल. कारण खोपोली एक्झिटपासून कुसगाव सिंहगड इन्स्टिट्युटपर्यंतचा पूर्ण पट्टाच प्रवाश्यांना या लिंकरोडमुळे टाळता येऊ शकेल. हा लिंकरोड १३.३ किलोमीटर लांब आहे. यापैकी ८.९ किलोमीटरचा भाग डोंगरांमधून जातो तर १.७ किलोमीटरचा बोगदा आहे. याशिवाय या मार्गात अनुक्रमे ८४० मीटर आणि ६५० मीटरचे दोन केबल ब्रिज आहेत.
घाटातील भाग टाळण्याचा प्रयत्न
या प्रकल्पाची एकूण किंमत ६ हजार ५९५ कोटी आहे. घाटातला रस्त्याचा पूर्ण भाग टाळून थेट पुढे जाता यावं, यासाठी हा लिंक रोड तयार करण्यात येत आहे. यातून खोपोली ते कुसगावपर्यंतचा टप्पा शून्य अपघात क्षेत्र करण्याचा मानस या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय घाटाच्या परिसरात होणारा वाहतुकीचा खोळंबाही यामुळे कमी करता येऊ शकेल. २०१९ साली या प्रकल्पाचं काम सुरू झालं होतं. २०२२ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण मध्यंतरी आलेल्या करोनाच्या साथीमुळे हे काम रखडलं. आता जून २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.