जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसमधील १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. हे सर्व जण बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे सदस्य आहेत. संबंधित पथक हे मुंबईहून पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव, सुदर्शन नगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून रात्री उशिरा हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं होतं. परंतु, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तीव्र उतार असलेल्या ठिकाणी बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती काल शुक्रवारी देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभागी होत जल्लोष केला. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव या ठिकाणी बाजीप्रभू ढोल ताशा पथक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. त्यानंतर ४० ते ४२ जण खासगी बसमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज पहाटे साडेचारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळली. यात जागीच १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांनी केलेल्या वादनाचे व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून मृत्यू झालेल्या तरुण-तरुणींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. गेल्या वर्षीच हे पथक निर्माण करण्यात आलं होतं, अशी माहितीदेखील समोर येत आहे. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत आर्थिक मदत जाहीर केली आहे.
“घडलेल्या घटनेवर आम्हाला विश्वास बसत नाही. बाजीप्रभू ढोल ताशा पथकातील सदस्य हे काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वादनासाठी आले होते. चार ते पाच तास ते आमच्या मंडळासोबत होते. अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात त्यांनी ढोल ताशा वादन केलं. मनमोकळेपणाने आमच्या सोबत राहिले, आमच्या कुटुंबाचा ते एक भाग झाले होते. असं आम्हाला काही वेळ वाटलं. आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो”, असे मत सुदर्शन नगर भीम जयंती मंडळाचे सदस्य अरविंद कसबे यांनी व्यक्त केले.