सोन्यालाही वरचढ असणाऱ्या प्लॅटिनमची विक्री देशात जोरात सुरू असून जागतिक स्तरावर प्लॅटिनमची आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. देशात चेन्नईत प्लॅटिनमच्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री होत असून त्याखालोखाल गुजरातने बाजी मारली आहे. गुजरातनंतर प्लॅटिनमच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याने स्थान मिळवले असून पुण्यात प्लॅटिनमच्या विक्रीच्या वाढीचा दर ३० ते ३५ टक्के आहे.
‘प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल’चे व्यापार व्यवस्थापक राहिल माहिमतुले यांनी ही माहिती दिली. ‘रांका ज्वेलर्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांच्या हस्ते प्लॅटिनम दागिन्यांच्या नव्या श्रेणीचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
माहिमतुले म्हणाले, ‘‘सोन्यापेक्षा प्लॅटिनम धातू जवळपास दहा टक्क्य़ांनी महाग आहे. प्लॅटिनम दागिन्यांची रीटेल किंमत सोन्यापेक्षा २० ते ३० टक्क्य़ांनी अधिक आहे. असे असले तरी प्लॅटिनमच्या किमतीत सोन्याप्रमाणे फारसे चढउतार होत नसून या दागिन्यांना देशात असलेली मागणीही कायम आहे. सोन्यापेक्षा हा धातू ३० पटींनी दुर्मिळ आहे. दक्षिण आफ्रिकेतून ८५ टक्के प्लॅटिनम आयात केले जाते. जगात चीन प्लॅटिनमची सर्वाधिक आयात (५५ टन) करतो. अमेरिका आणि जपान आयातीत द्वितीय क्रमांकावर (१० ते १५ टन) तर भारत तृतीय क्रमांकावर (३ टन) आहे. प्लॅटिनम दागिन्यांमध्ये सर्वाधिक मागणी ‘प्लॅटिनम लव्ह बँड’ अंगठय़ांना आहे. या अंगठय़ा चाळीस हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध असून त्यांची किंमत वजन व वापरल्या गेलेल्या हिऱ्याच्या दर्जावर ठरते.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा