खंडाळ्याजवळ मंकी हिल भागामध्ये लोहमार्गावर दरड कोसळल्याने हजरत निजामुद्दीन- पुणे दुरंतो एक्स्प्रेसचे इंजिन लोहमार्गावरून घसरले. सुदैवाने गाडीचे डबे रुळावरून न घसरल्याने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. मात्र, या घटनेमुळे पुणे- मुंबई दरम्यानही रेल्वे वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती. पुण्याहून सुटणाऱ्या व मुंबईहून येणाऱ्या विविध गाडय़ा त्यामुळे उशिराने धावत होत्या.
खंडाळा व परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मंकीहिल भागामध्ये लोहमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे सकाळी सहाच्या सुमारास या भागात आलेल्या दुरंतो एक्स्प्रेसचे इंजिन लोहमार्गावरून घसरले. याबाबत माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या वतीने तातडीने घटनास्थळी यंत्रणा पाठविण्यात आली. इंजिन घसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. मुंबईवरून दुसरे इंजिन आणून ही गाडी दुसऱ्या मार्गावर घेण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास ही गाडी पुण्याकडे रवाना झाली. त्यानंतर लोहमार्गावरील दरड हाटविण्याबरोबरच घसरलेले इंजिन पुन्हा लोहमार्गावर आणण्यात आले. या कामासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागला.
हजरत निजामुद्दीन- पुणे दुरंतो एक्स्प्रेस पुण्यात सकाळी सात वाजता पोहोचत असते, मात्र या घटनेमुळे शुक्रवारी ही गाडी दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी पुणे स्थानकावर पोहोचली. या घटमनेमुळे पुणे- मुंबई मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई- पुणे इंटरसिटी सुटण्यास सुमारे चाळीस मिनिटांचा उशीर झाला. मुंबई- बंगळुरू ही गाडी २५ मिनिटे उशिराने धावत होती. त्याचप्रमाणे सकाळी सव्वासात वाजता पुणे स्थानकावरून सुटणारी डेक्कन क्वीन सुमारे ४० मिनिटांनी उशिरा सोडण्यात आली. 

Story img Loader