लोणावळा- खंडाळा भागात झालेल्या जोरदार पावसाचा फटका पुणे- मुंबई रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला. मंकी हिल भागातील एक झाड कोसळून रेल्वेच्या ओव्हरहेड वाहिनीवर पडल्याने पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्याचप्रमाणे पुणे- मुंबई द्रुतगती मर्गावर व महामार्गावरही जाहिरातीचा फलक व झाड कोसळल्याने दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
खंडाळा परिसरामध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या. याच दरम्यान मंकी हिल भागामध्ये ओव्हरहेड वाहिनीवर झाड कोसळले. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली. पडलेले झाड बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सुरुवातीला मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. झाडाचा वाहिन्यांवर पडलेला भाग पूर्णपणे बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. या प्रकारामुळे सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या पुणे-मुंबई दरम्यानच्या गाडय़ा मध्येच अडकून पडल्या होत्या. त्याचप्रमाणे चेन्नई एक्स्प्रेसलाही २० ते ३० मिनिटांचा उशीर झाला.
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर लोणावळा येथे आणि द्रुतगती मर्गावर खंडाळा येथे झाड व फलक पडल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली होती. पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुमारे अडीच-तीन तास ठप्प झाली होती. फलक व झाड बाजूला केल्यानंतर संध्याकाळी या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होऊ शकली. मात्र, या दरम्यान अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा