पुणे : गेल्या सहा वर्षांत रस्तेदुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल दोन हजार १०० कोटींचा खर्च केला आहे. त्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने शहरातील सर्व रस्ते दुरुस्तीसाठी किमान एक हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र निधीची चणचण, अर्धवट रस्तेदुरुस्ती आणि रस्ते दुरुस्तीनंतर होणारी खोदाई या कारणांमुळे शहरातील रस्ते पुन्हा खड्ड्यात जाणार आहेत. त्यामुळे खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कायम राहणार असून, रस्ते गुळगुळीत होतील, ही शक्यताही कमीच आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत रस्ते दुरुस्तीसाठी चारशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. हा खर्चही केवळ उधळपट्टी ठरणार आहे.
महापालिकेच्या पथ विभाग, मलनिस्सारण, विद्युत विभागाबरोबरच मेट्रो मार्गिकेच्या कामांसाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात येते. याशिवाय खासगी, शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांकडूनही सेवा वाहिन्या टाकण्यासाठी वारेमाप रस्तेखोदाई गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पावसाळ्याचा कालावधी सोडला तर शहरातील रस्त्यांची सातत्याने खोदाई सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असून, रस्ते दुरुस्तीचे काम महापालिकेला सातत्याने हाती घ्यावे लागत असून रस्ते दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे.
हेही वाचा : राज्यात प्रथमच! ससूनमध्ये ‘लठ्ठपणा’साठी स्वतंत्र वॉर्ड
गेल्या सहा वर्षांत महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी दोन हजार १०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. अपुरा निधी, रस्ते दुरुस्तीची कामे झाल्यानंतर पुन्हा होणारी रस्ते खोदाई, दुरुस्तीच्या कामांचा निकृष्ट दर्जा यामुळे रस्ते खड्ड्यात जात आहेत.
महापालिकेच्या पथ विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी यंदा चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. क्षेत्रीय स्तरावरही स्वतंत्र निधी असल्याने त्या माध्यमातूनही रस्ते दुरुस्तीची कामे केली जातात. यंदा भर पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. रस्ते दुरुस्तीची कामे अशास्त्रीय पद्धतीने झाल्याचा प्रकारही पुढे आला होता.
निधी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम पथ विभागाकडून केले जात नाही. काही अंतरातच रस्ते दुरुस्ती केली जाते. त्याचा फटका संपूर्ण रस्त्याला बसतो. त्यातच कामे झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदाई करण्यात येते. यंदाही हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे खड्ड्यांचे शुक्लकाष्ट कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी किमान एक हजार कोटी निधीची आवश्यकता भासणार आहे. मात्र हा निधी महापालिकेला टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने रस्ते दुरुस्तीवरही मर्यादा येत आहेत.
हेही वाचा : पवना नदीच्या पाण्यावर फेसाळ थर
शहरातील रस्त्यांची लांबी
शहरात एकूण १ हजार ३९८.६५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ९७०.८६ किलोमीटर, १२ ते १४ मीटर रुंदीचे ३१४ किलोमीटर, २४ ते ३० मीटर रुंदीचे ६०.५४ किलोमीटर, ३० ते ३६ मीटर रुंदीचे २९.९६ किलोमीटर, ३६ ते ६१ मीटर रुंदीचे २३.२९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. यातील डांबरी रस्त्यांची लांबी ९४४.१२ किलोमीटर एवढी, तर २१०.३९ किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते आहेत.
हेही वाचा : ज्योतिषाकडून मुहूर्त काढून बारामतीत दरोडा, ज्योतिषासह सहा जण अटकेत
सहा वर्षांतील खर्च
२०१७-१८- ४२३ कोटी
२०१८-१९- ४३८ कोटी
२०१९-२०- ३०५ कोटी
२०२०-२१- ४५३ कोटी
२०२१-२२- ३६१ कोटी
२०२२-२३- २०० कोटी
शहरातील डांबरी रस्त्यांची दुरस्तीसाठी किमान एक हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र सततची रस्ते खोदाई होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यासाठी विभागात समन्वय आवश्यक आहे, असे पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.