शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते डांबरीकरणाची कामे डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : गरजूंच्या दिवाळी धान्यसंच वितरणात अडथळे
पावसाने शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. शहरात १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमुख रस्ते, उपरस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने आणि रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर महापािलका प्रशासनावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे रस्ते दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी १०० कोटींच्या निधीला मान्यता दिली होती. त्यानुसार रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार असून महिन्याभरात ती पूर्ण होईल.
हेही वाचा >>>पुणे-नागपूर खासगी बससाठी अधिकृत भाडे ३२०० रुपयांवर ; दिवाळीतील मागणीमुळे काही वाहतूकदारांकडून मनमानी भाडे
शहरातील रस्त्यांची एकूण लांबी १ हजार ४०० किलोमीटर एवढी आहे. बारा मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांची लांबी ४२८ किलोमीटर एवढी असून बारा मीटर पेक्षा कमी रुंदीचे ९७१ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. महापालिकेने पावसाळापूर्व कामे करताना ५.४० लाख चौरस मीटर क्षेत्रफळात रस्ते दुरुस्ती केली होती. तर पावसाळ्यानंतर सात लाख चौरस मीटर रस्त्यांची डागडुजी करावी लागणार आहे. यामध्ये बारा मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे आकारमान पाच ते सहा लाख चौरस मीटर एवढे आहे. तर सध्या बारा ते तेरा लाख चौरस मीटर क्षेत्राची डागडुजी करावी लागणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान अडीचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>पुणे : सदोष देयके मिळालेल्या ९७ हजार मिळकतींचे फेरसर्वेक्षण
पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करून डिसेंबरमध्ये कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. सध्या महापािलकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या जुन्या हद्दीबरोबरच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील रस्त्यांचे सर्वेक्षण केले. रस्त्यावरील डांबर निघाल्याने खडी उघडी पडणे, डांबर निघाल्याने रस्त्यावर पॅच तयार होणे, असमतोल चेंबरमुळे खड्डा तयार होणे, दुभाजक काढल्यानंतर तेथे डांबरीकरण न झाल्याने अपघातसदृश परिस्थिती निर्माण होणे, सेवा वाहिन्यांसाठी खोदकाम केल्यामुळे डांबरीकरणानंतरही रस्ता खचलेला असणे, रस्त्याला तडे गेलेल्या रस्त्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत.