पुणे महापालिकेच्या हद्दीत पुणे आणि खडकी कटक मंडळांचा (कॅन्टोन्मेंट बोर्ड) परिसराच्या विलीनीकरणासंदर्भात बुधवारी (३० मे) बैठक होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दोन्ही कटक मंडळांमधील रहिवासी भागाचे विलीनीकरण, मंडळातील कर्मचारी वर्गाला सामावून घेण्याची संभाव्य प्रक्रिया, त्यांच्या अखत्यारितील शाळा, रुग्णालये, मोकळ्या जागांचा प्रश्न, बांधकाम नियमावली आदींबाबत चर्चा होणार आहे.
हिमाचल प्रदेशमधील योल कटक मंडळ नुकतेच बरखास्त करून लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्यात आले. त्या कटक मंडळातील लष्करी आस्थापनांचा परिसर वगळून उर्वरित नागरी भाग स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे आणि खडकी कटक मंडळांचे विलीनीकरण पुणे महापालिकेत करण्याची आग्रही मागणी केली जात आहे.
हेही वाचा >>> अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईस टाळाटाळ; परवाना निरीक्षकांवर अशी झाली कारवाई
महापालिका आयुक्तांनी दोन्ही कटक मंडळांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘पुणे आणि खडकी कटक मंडळांच्या विलीनीकरणाबाबत ही बैठक घेण्यात येणार आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया झाल्यास पुणे महापालिकेप्रमाणे कटक मंडळांच्या नागरी भागात चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) लागू होणार किंवा कसे, कटक मंडळांच्या अखत्यारितील मोकळ्या जागा महापालिकेच्या ताब्यात येणार का, त्यांच्या कर्मचारी वर्गाला कशा प्रकारे सामावून घेण्याची प्रक्रिया कशी असेल, तेथील शाळा व रुग्णालये महापालिकेच्या अखत्यारीत येणार का, अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.’
हेही वाचा >>> पुणे: होऊ दे खर्च…बहुचर्चित कात्रज- कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटी जमा
दरम्यान, या बैठकीनंतर कटक मंडळ क्षेत्रातील केवळ निवासी भाग महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट होणार आहे, की मालमत्ता, दवाखाने, कर्मचारी वर्ग, शाळा या देखील महापालिकेकडे वर्ग होणार आहेत, याबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. त्यानंतर महापालिका या संदर्भातील अहवाल तयार करून राज्य सरकारला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.
…म्हणून काम रखडल्याचा दावा
राज्याच्या नगरविकास विभागाकडून पुणे कटक मंडळाच्या रहिवासी भागाचाा अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे महापालिकेला देण्यात आले आहेत. मात्र, मंडळामधील लोकसंख्या आणि इतर सुविधांची माहिती संकलित करून अहवाल सादर करण्यास महापालिकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत नगरविकास खात्याकडून महापालिकेला चार वेळा स्मरणपत्रे पाठविण्यात आली आहेत. मात्र, पुणे कटक मंडळाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अहवालाचे काम रखडल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.