पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या पाण्याच्या सर्व टाक्यांची स्वच्छता करण्याची घोषणा महापालिकेने करूनही, आतापर्यंत १४४ पैकी ५२ टाक्यांचीच स्वच्छता करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. उर्वरित टाक्यांची स्वच्छता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.शहरात दोन महिन्यांपूर्वी जीबीएस आजाराचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, नांदेड, धायरी, किरकिटवाडी आणि आजूबाजूच्या परिसरात या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. या भागातील नागरिकांना मिळणारे पाणी दूषित असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.

नागरिकांना दिले जाणारे पाणी शुद्ध असावे, यासाठी महापालिकेने क्लोरिनची मात्रा वाढविली. तसेच पाणी दूषित होऊ नये, त्यामध्ये कचरा पडू नये, यासाठी ज्या विहिरीतून पाणी दिले जाते त्यावर लोखंडी जाळीदेखील बसविण्यात आली. किरकिटवाडी, खडकवासला, नांदेड, नांदोशी, धायरी यासह आजूबाजूच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागातील काही मलवाहिन्यांची कामे देखील करून घेतली आहेत. वाढत्या जीबीएस रुग्णांची संख्या लक्षात घेता महापालिकेने पाणीपुरवठा विभागाच्या शहरातील पाण्याच्या टाक्या खबरदारीचा उपाय म्हणून स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या शहरात १४४ पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये काही टाक्या भूमिगत असून, काही जमिनीवर आहेत. एकूण टाक्यांपैकी आतापर्यंत ५२ टाक्यांची स्वच्छता केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

‘जीबीएसचा प्रादुर्भाव पाण्यातील जीवाणूंमुळे होतो. शहरातील इतर भागांमध्ये हा आजार पसरू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या २४ टाक्यांची स्वच्छता आतापर्यंत पूर्ण झाली आहे. या भागात जीबीएसचा प्रादुर्भाव अधिक आढळल्याने या भागातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात आले,’ असे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

जगताप म्हणाले, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करताना योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नागरिकांचा पाणीपुरवठा टाक्यांवर अवलंबून असल्याने टाक्या स्वच्छ करताना काळजी घेतली जाते. टप्प्याटप्प्याने टाक्या स्वच्छ केल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील सर्व टाक्या स्वच्छ करण्यासाठी वेळ लागणार आहे.