महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची झालेली फेररचना, त्यातून बदललेली राजकीय परिस्थिती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अशा काही बाबींचा थेट परिणाम सहकारनगर-पद्मावती या प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये दिसून आला. या प्रभागात राष्ट्रवादीच्या दोघांनी बंडखोरी केली; पण त्यातील एका बंडखोराला थोपविण्यात पक्षाला यश आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवलाल भोसले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळविल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना अशी सरळ लढत या प्रभागातील एका जागेवर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आजी-माजी नगरसेवकांमधील या लढतीकडे लक्ष लागले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्राबल्य आहे. विद्यमान नगरसेवक आणि माजी सभागृहनेता सुभाष जगताप, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका अश्विनी कदम या तिघांना या प्रभागातून उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात काही जागांवर आघाडी झाली. त्यामध्ये या प्रभागाचा समावेश आहे. त्यामुळे तीन मातबर विद्यमान नगरसेवक या प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत. यापैकी जगताप आणि शिवलाल भोसले अशी सरळ लढत ड गटातील सर्वसाधारण जागेसाठी होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना ऑक्टोबर महिन्यात झाली. त्यानुसार प्रभाग क्रमांक पस्तीस सहकारनगर-पद्मावती हा प्रभाग नव्याने अस्तित्वात आला. प्रारंभी आघाडी होणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत असल्यामुळे या प्रभागातून उमेदवारी मिळेल, अशी अनेकांना आशा होती. आघाडी झाल्यास या प्रभागातील विद्यमान नगरसेवकांपुढे पत्ता कट होणार, हेही काहींना उमगले होते. त्यामुळे या प्रभागातील बहुतांश जागांवर इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. याच कालावधीत आघाडीचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिल्यामुळे शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नगरसेवक शिवलाल भोसले यांना उमेदवारी नाकारण्यात आली. सर्वसाधारण गटातील जागेसाठी शिवलाल भोसले हे इच्छुक होते. उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. दरम्यान, अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतरही त्यांचे पती नितीन यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.
त्यामुळे या जागेवर तिरंगी लढत होणार असे वाटत असतानाच नितीन यांचे बंड थोपविण्यात पक्षाला यश आले. त्यामुळे शिवलाल भोसले-सुभाष जगताप यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे.
काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यामुळे या प्रभागातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातील काही भागात शिवसेनेचीही ताकद आहे. या प्रभागात उच्चभ्रू सोसायटय़ांचा जसा भाग आहे तसाच काही भाग हा झोपडपट्टय़ांचा आहे. त्यामुळे कोणत्या भागात किती मतदान होणार, यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
- खुल्या गटातील जागेवर चुरशीची लढत
- नितीन कदम यांची बंडखोरी थोपविण्यात यश
- भोसले-जगताप आमने-सामने
- बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेकांचे पत्ते कट