पुणे : गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महापालिकेची पहिली पूर्णवेळ महिला नगरसचिव होण्याचा बहुमान भोसले यांना मिळाला आहे.
महापालिकेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या नगरसचिव विभागात नगरसचिव या पदाची नियुक्ती पदोन्नतीने केली जाते. चार वर्षांपूर्वी ३१ ऑगस्ट २०२० रोजी सुनील पारखी या पदावरून निवृृत्त झाले. त्यानंतर कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. तीन वर्षांनंतर दौंडकर निवृत्त झाले. त्यामुळे तत्कालीन राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्याकडेच या विभागाचा कार्यभार होता.
हेही वाचा >>>महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून अतिरिक्त निधी; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
नगरसचिव पदासाठी तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी जानेवारी २०२१ मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती. पात्रतेच्या निकषानुसार होणाऱ्या या पदभरतीसाठी महापालिकेतील २९ अधिकारी इच्छुक होेते. विधी शाखेची पदवी हा त्यासाठी महत्त्वाचा निकष होता. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यांपैकी एकही उमेदवार पात्र नसल्याने नगरसचिव पदाची नियुक्ती प्रक्रिया विक्रम कुमार यांनी रद्द केली होती. त्यानंतर महापालिकेच्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत भोसले यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्या महापालिकेच्या पहिल्या पूर्णवेळ महिला नगरसचिव ठरल्या आहेत.
दरम्यान, नगरसचिव कार्यालयातील राजकारणाला न जुमानता भोसले यांनी नियमानुसार काम केले आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती योग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी या नियुक्तीबद्दल भोसले यांचे अभिनंदन केले.