संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे आणि शास्त्रीय गायिका डॅा. रेवा नातू यांना पुणे महापालिकेच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार जाहीर करून वर्षभराचा कालावधी लोटला. पण, ‘गेले द्यायचे राहूनी’ अशीच या पुरस्काराची अवस्था झाली आहे. बालगंधर्व पुरस्कार प्रदान कार्यक्रम केव्हा या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही.
संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे महापालिकेतर्फे दरवर्षी एका ज्येष्ठ कलाकारास बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचबरोबरीने नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कार केला जातो. करोना प्रादुर्भावामुळे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांचे पुरस्कार निर्मला गोगटे आणि रेवा नातू यांना देण्याची घोषणा गेल्या वर्षी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्याला आता वर्ष झाले असून रविवारी (२६ जून) बालगंधर्व जन्मदिन साजरा होत असताना हे पुरस्कार केव्हा प्रदान केले जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेची मुदत संपुष्टात आली असून महापालिका आयुक्त सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
महापालिकेचे अन्य पुरस्कारप्राप्त कलाकार ( २०२० वर्ष )
- किरण यज्ञोपवीत (लेखन-दिग्दर्शन)
- प्रवीण बर्वे (नाट्य व्यवस्थापक)
- रवींद्र कुलकर्णी (संगीत रंगभूमी)
- संदीप देशमुख (रंगमंच व्यवस्थापन)
- अनुराधा राजहंस (बालगंधर्वांच्या नातसून)
२०२१ वर्ष - प्रसाद वनारसे (दिग्दर्शन)
- रमा चोभे (व्हायोलिनवादक)
- समीर हंपी (नाट्य व्यवस्थापक)
- प्रदीप वैद्य (प्रकाशयोजनाकार)
- गणेश माळवदकर (रंगमंच व्यवस्थापन)
मला बालगंधर्व पुरस्कार गेल्या वर्षी जाहीर झाला होता. १५ जुलै रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. पुरस्कार जाहीर झाला त्याला एक वर्ष झाले. मात्र, पुरस्कार प्रदान कार्यक्रम केव्हा होणार याची मला कल्पना नाही.– डॅा. रेवा नातू