पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद द्यावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांतील महापालिकेसाठी इच्छुकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यांनी ५० ते १०० कोटी रुपयांच्या कामाच्या याद्या पालिकेकडे दिल्या आहेत. अंदाजपत्रकात तरतूद करताना प्रशासनाशी सुसंगत असलेल्या कामांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे. प्रशासकावर राज्य सरकारचा दबाब असल्याने आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी सादर केल्या जाणाऱ्या महापालिकेच्या अंदाजपत्रकावर भाजपच्या योजनांची छाप असणार हे निश्चित आहे. त्यातच गेल्या आठवड्यात महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकाच्या बैठका महापालिकेत न घेत विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यास सुरुवात केल्याने त्याची उलटसुलट चर्चा महापालिकेत सुरु झाली होती.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, पुण्यातील आमदारांच्या विधानसभानिहाय याद्या महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. अंदाजपत्रकात तरतूद मिळावी यासाठी आपण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधूनसुद्धा निधीचे घबाड मिळणार आहे, असे जाहीर वक्तव्य केले होते. पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाचे शहरातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

महापालिकेचे अंदाजपत्रक हे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे असले पाहिजे. ते विशिष्ट पक्षाचे असू नये, अशी भूमिका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. महापालिका आयुक्त हे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी अंदाजपत्रकात ठराविक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधी उपलब्ध करून दिल्यास याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महापालिका प्रशासन सध्या २०२५-२६ या वर्षीचे अंदाजपत्रक तयार करत आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. ५० ते १०० कोटींची तरतूद अंदाजपत्रकात मिळावी, यासाठी याद्या आल्या आहेत.

या याद्या सर्वांच्याच आहेत. महापालिकेचे अंदाजपत्रक पाहता निधी देण्यावर मर्यादा आहे. महापालिका प्रशासनाच्या कामाशी सुसंगत असणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहणार आहे. अंदाजपत्रक तयार करत असताना कोणाचाही दबाव नाही. महापालिका प्रशासन आवश्यक्तेनुसार कामाच्या तरतुदी केल्या जाणार आहेत.’

महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले म्हणाले, महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद व्हावी, यासाठी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या याद्या येत आहेत. मात्र अंदाजपत्रकात कशासाठी तरतूद करायची हे संबधित विभागाच्या आवश्यकतेनुसार निश्चित केले जाणार आहे. कामाच्या याद्या दिल्या, म्हणजे तरतूद झाली, असे नाही.

Story img Loader