पुणे : पादचारी पुलांचा वापर होत नसल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने या पादचारी पुलांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पुलांवर तातडीने स्वच्छता मोहीम राबवून क्षेत्रीय कार्यालयांकडे पुलांच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ज्या ठिकाणी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता आहे, अशाच ठिकाणी आता हे पादचारी पूल उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
रस्ता ओलांडताना नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, या हेतूने महापालिकेने शहरातील विविध भागांत १० ठिकाणी पादचारी पूल उभारले आहेत. मात्र, या पादचारी पुलांचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत महापालिकेने उभारलेले पादचारी पूल वापराविना पडून आहेत. काही पादचारी पुलांच्या पायऱ्या तुटल्या आहेत, तर काही पुलांची लिफ्ट बंद अवस्थेत आहे. अनेक पुलांवर घाणीचे साम्राज्य असून, मद्यपींकडूनही पुलाचा वापर होत असल्याचे दिसून येते. पादचारी पुलांच्या या दुरवस्थेबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने या पुलांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा >>>शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
‘पुलांचा वापर करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथे स्वच्छता ठेवली जाणार आहे. तसेच, गंजलेल्या, तुटलेल्या लोखंडी जाळ्या, बंद पडलेल्या लिफ्ट याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत,’ असे महापालिकेचे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
ज्या भागात हे पादचारी पूल आहेत, तेथील क्षेत्रीय कार्यालयाकडे स्वच्छता, तसेच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ठरावीक काही दिवसांनी या पुलांच्या स्वच्छतेचा आणि अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. या पुढील काळात रस्ता ओलांडण्यासाठी वापर होईल, त्याच ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचे नियोजन केले जाईल.
हेही वाचा >>>पुणे: महापालिकेच्या एका निर्णयामुळे शहरात वाढणार गुलाबी रिक्षांची संख्या !
विश्रांतवाडी येथील आंबेडकर चौकात रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल उभारण्यात आला होता. मात्र, याचा उपयोग केला जात नव्हता. या रस्त्यावर आता भुयारी मार्ग, तसेच उड्डाणपूल उभारण्याचे नियोजित आहे. त्यामुळे हा पादचारी पूल काढून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहासमोर बसविण्यात आला आहे. या पुलाचा वापर करून विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयाच्या परिसरातून वसतिगृहात जाता येणार आहे. ये-जा करण्यासाठी पुलाचाच वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. तसेच, या पुलातील काही भाग विश्रांतवाडीतील प्रतीकनगर येथे लावण्यात आला आहे.
पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. पादचारी आपला जीव धोक्यात घालून पूल असतानाही रस्ता ओलांडतात. नागरिकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांचाच वापर करावा, असे -मुख्य अभियंता (प्रकल्प) युवराज देशमुख यांनी सांगितले.