पुणे : शहरातील ज्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, अशा प्रकल्पांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलासह अन्य काही प्रकल्पांचा समावेश आहे.
सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाइम चित्रपटगृहादरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. केवळ पथदिवे व दिशादर्शक फलक बसविणे हे काम शिल्लक आहे. महापालिकेच्या वतीने या भागात सव्वादोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरूच असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यास या भागातील होत असलेली वाहतूक कोंडी सुटणार आहे. त्यामुळे हा पूल तातडीने नागरिकांना वापरण्यासाठी खुला करावा, अशी मागणी केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘या उड्डाणपुलासह इतर काही प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत. त्या सर्वांची पाहणी प्रत्यक्ष जाऊन करणार आहे. येथे सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत, की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्यातील त्रुटींवरून नागरिकांकडून टीका होऊ नये, यासाठी पाहणी करणार आहे. ही पाहणी अचानक केली जाईल. त्यानंतर पूल खुला करण्याबाबतचे निर्णय घेतला जाईल. इतर पूर्ण होत असलेल्या प्रकल्पांची पाहणीदेखील अचानकपणे करणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
श्रेयासाठी रखडले लोकार्पण?
महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, असा प्रयत्न या भागातील लोकप्रतिनिधींचा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने काम पूर्ण होऊनही याचे लोकार्पण रखडल्याची चर्चा आहे