पुणे : महापालिका हद्दीत दोन वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या २३ गावांतील विकासासाठी महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये जुलै २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश करण्यात आला. महापालिका हद्दीत गावांचा समावेश झाल्यानंतरही या गावातील समस्या कायम राहिल्या असून, महापालिकेकडून पायाभूत सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे समाविष्ट गावात पायाभूत सुविधा पुरविणे आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये कोणत्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी असावेत, हा तिढा निर्माण झाल्याने समितीची स्थापना झालेली नाही. या परिस्थितीत महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील पाणी, कचरा संकलन, रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटारे, पथदिवे आदी प्रश्न या अधिकाऱ्यांकडून सोडविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’

अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करताना गावाची हद्द आणि लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. वाघोली, बावधन बुद्रुक ही दोन्ही गावे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने या गावांसाठी एक उपायुक्त, एक सहायक आयुक्त, दोन संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर उर्वरित गावांसाठी स्वतंत्र अधिकारी न देता उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दोनपेक्षा जास्त गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे : विद्यापीठ चौकातील कोंडीतून लवकरच सुटका! उभा राहतोय मेट्रोशी संलग्न दुमजली उड्डाणपूल

वाघोली गावाची जबाबदारी किशोरी शिंदे यांच्याकडे असून कोपरे, कोंढवे-धावडे, सणसनगर, नांदोशी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला, किरकिटवाडी, जांभूळवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी गावांची जबाबदारी आशा राऊत यांच्याकडे आहे. उपायुक्त संतोष वारूळे यांच्याकडे म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक गावची जबाबदारी असून औताडे, हांडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बुद्रुक, गुजर-निंबाळकरवाडी, पिसोळी आणि वडाचीवाडी या गावांसाठी प्रसाद काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation commissioner vikram kumar appointed 28 officers for the development of newly added 23 villages of pune district pune print news apk 13 css