पुणे : बांधकामे करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील १२५ बांधकामांना नोटीस देत काम बंद करण्यास सांगितले होते. मात्र, या नोटिसांवर एकाही विकसकाने खुलासा केलेला नाही. इतकेच नव्हे तर नोटीस दिलेली बांधकामे नक्की बंद आहेत की नाही? हे पाहण्याची तसदीही बांधकाम विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा केवळ फार्स पालिकेने केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बांधकामे करताना प्रदूषण मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे बंधन महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांवर घातले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कारण पुढे करत बांधकाम विभागाने दोन दिवस कारवाई करत शहरातील विविध भागांतील १२५ बांधकामांना नोटीस देत त्यांना काम थांबविण्याचे आदेश दिले होते. यामध्ये कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी, कर्वेनगर, धायरी, नऱ्हे, कात्रज, आंबेगाव, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी, धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, बोपोडी तसेच एरंडवणा या भागातील बांधकामांचा समावेश होता.

हेही वाचा >>>खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी

शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तसेच गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम देखील सुरू असल्याने येथे काम करताना मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते. बांधकाम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने ही धूळ उडते. त्याचा त्रास वाहनचालकांना, नागरिकांना होतो. या धुळीमुळे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. नागरिकांना फुफ्फुस, रक्तवाहिन्या, डोळ्यांसंबंधित आजार होत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रदूषण मंडळाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत बांधकामे करणाऱ्यांना नोटीस देत काम थांबविण्यास सांगितले होते.

हेही वाचा >>>पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट

बांधकाम विभागाने नोटीस दिल्यानंतर त्यावर कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाने पालिकेकडे खुलासा केलेला नाही. तसेच बांधकाम विभागाने देखील पुढे काहीही केले नसल्याचे समोर आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन नोटीस दिलेले बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे की नाही? काम थांबविण्याच्या नोटीस दिल्यानंतर शहरातील किती बांधकामे सुरू आहेत अथवा बंद आहेत ? याची माहिती घेण्याची साधी तसदी देखील बांधकाम विभागाने घेतली नाही. यामधून बांधकाम खात्याचे उदासीन धोरण समोर आले आहे. कारवाई करण्याचा केवळ फार्स बांधकाम विभागाने केला असल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

बांधकामे थांबविण्याच्या नोटिसा दिल्यानंतर ही बांधकामे बंद की नाही, याची पाहाणी सुरू केली जाणार आहे. नोटीस दिल्यानंतर देखील बांधकाम सुरू ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर यांनी सांगितले.

Story img Loader