पुणे : शहरातील चार झोनमधील १८ मीटरहून अधिक रुंदीचे ४० किलोमीटरचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने २०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते सफाईसाठी काढण्यात आलेल्या निविदा ५.७५ टक्के अधिक दराने आलेल्या असतानाही त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे एकाच ठेकेदाराला तीन निविदा मिळाल्याने यामध्ये ‘आर्थिक हितसंबध’ जोपासले गेल्याची जोरदार चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने स्वच्छ करण्यासाठा महापापालिकेच्या घनकचरा विभागाने निविदा काढल्या होत्या.
या निविदा १६० कोटी रुपयांच्या होत्या. जादा दराने १७२ कोटी रुपयांच्या निविदा महापालिकेकडे आल्या आहेत. पुढील सात वर्षांसाठी हे काम असून, प्रत्येक वर्षी सहा टक्के इतकी दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सात वर्षांमध्ये हा खर्च साधारण २०० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. चार झोनमधील ४० किलोमीटरचे रस्ते साफ केले जाणार आहेत. यासाठी तीन झोनमध्ये एकाच ठेकेदाराला हे काम मिळाले असून, एका झोनमध्ये दुसऱ्या ठेकेदाराला काम मिळाल्याने यामध्ये रिंग झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने याच कामासाठी काढलेल्या निविदा ३५ टक्के वाढीव दराने आल्या होत्या. त्यावरून सर्वच स्तरांतून महापालिकेच्या कारभारावर टीका झाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रचलित दराचा अभ्यास करून फेरनिविदा काढताना या कामाची अंदाज रक्कम प्रति किलोमीटरसाठी ३१३ रुपयांनी वाढविली.
स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आलेल्या चार झोनपैकी तीन झोनची कामे मुंबईतील मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रा. लि. या कंपनीला मिळाली आहेत. या कंपनीकडे झोन २, ३ आणि ४ चे काम असणार आहे. झोन १ चे काम बी. व्ही. जी. इंडिया लि. कंपनीला मिळाले आहे.
आधीचा ठेकेदार दिवाळखोरीत
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जाते. शहरातील पाचही झोनमधील रस्त्यांच्या सफाईच्या कामासाठी पूर्वी दोन निविदा काढल्या होत्या. त्यापैकी एका ठेकेदाराकडे एका झोनचे काम होते, तर उर्वरित चार झोनची कामे दुसऱ्या एका ठेकेदाराकडे होती. ज्या ठेकेदाराकडे चार झोनची कामे होती, तो दिवाळखोरीत निघाला. त्यामुळे त्याचे काम बंद झाले आहे. परिणामी, चार झोनमधील रस्त्यांचे झाडण काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत.
दहा किलोमीटर पदपथांची होणार स्वच्छता
महापालिकेने मान्यता दिलेल्या कामांमध्ये चारही झोनमधील साधारण १० किलोमीटरच्या पदपथांचा समावेश आहे. या रस्त्यांची नियमित स्वच्छता होणार आहे. नवीन निविदेत पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि बृहन्मुंबईमध्ये सुरू असलेल्या यांत्रिकी पद्धतीने झाडण कामाशी तौलनिक अभ्यास तसेच रोजंदारीच्या दरातील वाढ गृहीत धरून अंदाज केल्याने हा दर ३१३ प्रतिकिलोमीटर रुपयांनी वाढला आहे, असे घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कामाची तपासणी कशी?
निविदा मंजूर झाली, तरी ठेकेदाराने केलेल्या कामाची पडताळणी कशा पद्धतीने होणार, हे अद्याप गुलदस्तात आहे. यांत्रिकी पद्धतीने झाडणकामात अनेकदा रस्त्यांवर पाण्याचा वापर न करता मोटार फिरल्याने खूप धूळ उडते. त्याचा नागरिकांना मोठा त्रास होतो. धूळ मोठ्या प्रमाणावर असल्याने आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता राहते. निविदा मंजूर झाली, तरी एखादा रस्ता खरेच स्वस्छ झाला, की नाही, ठेकेदाराने खरेच काम केले की नाही किंवा नागरिकांना यांत्रिकी पद्धतीने झाडणकामाचा त्रास होतो आहे, की नाही हे तपासणारी यंत्रणाही कार्यान्वित होण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.