पुणे : महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेताना संबंधित जागामालक तसेच तेथील भाडेकरूंना नुकसानभरपाई कशी द्यायची, यासाठी येथील जागाबाधितांचे सर्वेक्षण पुन्हा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या भागातील जागामालक, भाडेकरूंच्या घरी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकारचा मोबदला अपेक्षित आहे, याची माहिती गोळा करून अहवाल तयार केला जाणार आहे.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी ही माहिती दिली. स्मारकासाठी आवश्यक असलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, जागा ताब्यात घेताना सक्तीचे भूसंपादन न करता जागामालकांना आवश्यक तो मोबदला देऊन या जागा ताब्यात कशा मिळतील, यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. महापालिकेने काही वर्षांपूर्वी या भागाचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी ९१ मिळकती बाधित होणार असल्याचे समोर आले होते. यामध्ये जागा मालक आणि भाडेकरूंचा समावेश आहे.

जागा ताब्यात घेताना महापालिकेने जागेच्या बदल्यात जागा द्यावी, अशी मागणी काहींची आहे. तर, काही भाडेकरू आणि जागामालकांनी रोख मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन वास्तू एकत्रित जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी येथील खासगी जागा ताब्यात घ्याव्या लागणार आहे. या दोन्ही वास्तूंचे एकत्रीकरण आणि विस्तारासाठी ९१ मिळकती बाधित होणार असून, त्याचे क्षेत्रफळ पाच हजार ३१० चौरस मीटर आहे. यामध्ये ५१६ मालक आणि २८५ भाडेकरू आहेत. या सर्वांशी चर्चा करून त्यांच्या जागा ताब्यात घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

महापालिकेला भूसंपादनासाठी किती नुकसान भरपाई द्यावी लागेल, याचा अभ्यास केला जाणार आहे. याबाबतच्या सर्व सूचना महापालिका प्रशसनाला देण्यात आल्याचेही आयुक्त राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये संबंधित जागामालक, भाडेकरूंशी संवाद साधून त्यांना नुकसानभरपाई काय पाहिजे, याबाबत सविस्तर चर्चा करून अहवाल तयार केला जाणार आहे.- डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त